महाराष्ट्र

मनोज जरांगे-पाटलांनी अन्न, पाणी व उपचारही नाकारले ! मराठा समाजाला केले ‘हे’ आवाहन

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसून आपला लढा सुरूच राहील, असा निर्धार करत उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टीमेटमनुसार, रविवारपासून अन्न, पाणी व वैद्यकीय उपचारही नाकारले आहे. राज्यातील जनतेने आपला लढा लोकशाही मार्गाने व शांततेत सुरू ठेवावा, असे आवाहनही जरांगे-पाटील यांनी केले आहे.

जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने न्याय्य हक्कासाठी लढावे, मात्र कायदा हातात घेऊ नये, गावागावात शांततेत आंदोलन करावे. आंदोलन करताना कोणतीही हिंसक घटना घडणार नाही, याची काळजी घ्यावी. मुंबई येथे सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आहे.

या बैठकीत सर्वांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, शासनाने आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले आहे. राज्यातील जनता मोठ्या प्रमाणात भेटायला येत आहे. त्यामुळे मला उपोषण करण्यासाठी बळ मिळत असून मीदेखील मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

कुणबी व मराठा एकच असल्याचे पुरावे सापडले..!

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना मराठा व कुणबी याविषयी चाललेला गोंधळ मिटण्यासाठी कुणबी व मराठा एकच असल्याच्या इंग्रजकालीन नोंदी व नकाशांचे पुरावे सापडले आहेत.

वाशिम येथील वयोवृद्ध व्यक्तीने अंतरवाली सराटी येथे येऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांची रविवारी उपोषणस्थळी भेट घेऊन त्यांच्याकडे पुरावे सुपूर्द केले आहे.

सरसकट मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश काढून मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मराठा व कुणबी हे एकच असल्याच्या काही इंग्रजकालीन दस्ताऐवजावरील नोंदी आणि नकाशा घेऊन वाशिम येथील वयोवृद्ध व्यक्तीने रविवारी अंतरवालीत येऊन मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेत त्यांच्याकडे पुरावे सुपूर्द केले आहे.

हे इंग्रजकालीन पुरावे सन १९३९ चे असून या इंग्रजकालीन पुराव्याच्या आधारे महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना आरक्षण मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुराव्यात महाराष्ट्रातील मराठा व कुणबी एकच असल्याचे नमूद करण्यात आल्याचे जरांगे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office