शासकीय वाळू डेपोमुळे अनेक अपघात ! नियम न पाळता उभारलेला हा वाळू डेपो बंद करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : येथील कोल्हार- हनुमंतगाव रस्त्यावर रामपूर फाट्यावर महसूल विभागाने उभारलेल्या वाळू डेपोमुळे अनेक अपघात घडत आहेत. प्रवरा नदी पात्रातून ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करताना रस्त्यावर सांडलेल्या वाळूमुळे वाहने स्लीप होऊन

आतापर्यंत तीन ते चार जखमी झाले आहेत, त्यामुळे नियम न पाळता उभारलेला हा वाळू डेपो बंद करा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

अवैध वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतः वाळू विक्रीचा निर्णय घेतला. त्यानुसार नदीपात्रालगत अनेक ठिकाणी वाळूचे डेपो सुरू करण्यात आले आहे. असाच डेपो रामपूर फाट्यावर देखील महसूल विभागाने उभारला आहे.

हे डेपो उभारताना महसूल विभागाने काही नियमावली बनवली होती. परंतु, रामपूरफाट्या नजीक उभारण्यात आलेला डेपो नियमावलीला धरून नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

महसूल विभागाचा डेपो उभारताना डेपो हमरस्त्यालगत नसावा, असा नियम असताना देखील हा डेपो कोल्हार हनुमंतगाव या मुख्य रस्त्यालगत उभारण्यात आला आहे. प्रवरा नदीपात्रातून ट्रॅक्टरद्वारे वाळू वाहतूक करून या डेपोमध्ये वाळू आणली जाते.

ही वाळू आणताना येणारे ट्रॅक्टर हमरस्त्याला टर्न घेताना प्रचंड वेगात असतात. रामपूर फाट्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने व अनेक वाहनधारकांना वाळू डेपो सुरू झाल्याची माहित नसल्याने अचानक रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरला पाहून वाहनधारकांनी ब्रेक दाबल्यावर वाहने स्लीप होतात.

त्यात वाळू वाहतूक करताना रस्त्यावर सांडलेली वाळू अपघाताला निमंत्रण देत आहे. या वाळूवर वाहने स्लिप होऊन आतापर्यंत एक महिला, दोन तरुण, दोन वयोवृद्ध जखमी झाले आहेत.

अपघातानंतर काही अपघातग्रस्तांनी वाळू वाहतुकीचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, वा ठेकेदारांने उपठेकेदार नेमण्याची लक्षात आले. मुख्य ठेकेदार म्हणतो उपठेकेदाराकडे नुकसानीची जबाबदारी आहे.

त्यामुळे वाहनधारकांना नुकसान भरपाईची रक्कम उपठेकेदार देईल, त्याच्याशी माझा संबंध नाही. उपठेकेदार सांगतो की, आम्हाला ठेका परवडला नाही. म्हणून आम्ही नुकसान भरपाई देणार नाही. ठेकेदाराच्या मुजोरीमुळे सामान्य वाहनधारकांचे आर्थिक, शारीरिक नुकसान होत आहे.

शासकीय वाळू डेपो सुरू होण्यापूर्वी अवैध वाळू वाहतूक केली जायची, तेव्हा जनसामान्यांच्या जीवाशी खेळले जायचे. आताही शासकीय वाळू वाहतूक सुरू असताना सुद्धा हाच प्रकार घडत असेल, तर सामान्य माणसांच्या जीवाला वाली कोण,

असा सवाल वाहनधारकांनी विचारला आहे. वाहनधारकांच्या जीविताशी खेळणाऱ्या ठेकेदाराबर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रामपूर परिसरातील ग्रामस्थ, वाहनधारकांनी केली आहे.

महसूल विभागाने तात्काळ कारवाई

करावी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून गरिबांना स्वस्तात वाळू मिळण्यासाठी शासनाने स्वतः वाळू विकण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे.

परंतु, शासन स्वतः वाळू उपसा करत नाही. त्यासाठी लावलेले ठेकेदार वाहनधारक व नागरिकांच्या जीवाशी खेळत असेल, तर महसूल विभागाने तात्काळ अश्या ठेकेदाराचे ठेका काढून नियम पाळणारा ठेकेदार द्यावा, अन्यथा हा डेपो बंद करावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.