अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे : राज्यातील बहुतांशी भागातील कोरड्या हवामानामुळे राज्यात थंडीचा मुक्काम कायम असून, पुढील काही दिवस कमी-जास्त प्रमाणात थंडी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सध्या मध्य महाराष्ट्र आणि परिसरात, तसेच मध्य प्रदेशादरम्यान चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे काही भागांत ढगाळ हवामान आहे. अशातच उत्तरेकडून येणारा थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडीत चढउतार होत आहे.
मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक भागांत थंडीचे प्रमाण वाढले होते.