Maharashtra News : शेतकरी, कष्टकरी वर्गाने राज्यात व देशात सुरू असलेले हे द्वेषाचे राजकारण समजून घेणे गरजेचे आहे. आपला नेमका शत्रू कोण, हे ओळखावे. ईडी, सीबीआयची धमकी देऊन कारवाया केल्या जात आहेत.
राहुल गांधींवर खटला दाखल होऊन काही दिवसांमध्ये निकाल दिला जातो. खासदारकी रद्द होऊन घर काढून घेतले जाते, हा सर्व प्रकार भयंकर आहे. देशाची लोकशाही धोक्यात आल्याचे हे चित्र आहे, अशी टीका आ. लहू कानडे यांनी केली.
केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासलेला प्रवर्ग तयार करून १० टक्के आरक्षणाची व्यवस्था केली. त्यामुळे मराठा समाजालाही केंद्राकडून आरक्षण मिळू शकते. मात्र त्याऐवजी मराठा विरूद्ध धनगर, अशी भांडणे लावली जात आहेत, असा आरोप आमदार लहू कानडे यांनी केला.
तालुक्यातील वडाळा महादेव व निपाणीवाडगाव येथे जनसंवाद यात्रेनिमित्त आयोजित बैठकीत आमदार कानडे बोलत होते. अध्यक्षस्थानी काशिनाथ कासार हे होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, ज्येष्ठ नेते उत्तमराव पवार, सरपंच अविनाश पवार, सुरेश पवार, उपसरपंच ताराबाई पवार, जगन्नाथ खाडे, पराजी गायधने, चांगदेव गोराणे, मुरली राऊत, विश्वास भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी आ. कानडे म्हणाले, सध्या देशामध्ये द्वेषाचे राजकारण केले जात आहे. देशात व राज्यात जाती धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचे काम सुरू आहे. हा नव्या प्रकारचा दहशतवाद आहे. त्याविरूद्ध राहुल गांधी यांनी डरो मत व प्रेमाने माणसे जोडण्याचा दाखविलेला मार्ग रचनात्मक आहे.
गांधी व नेहरू यांनी देशातील सर्व जातीधर्माला जोडण्याचे काम केले. काँग्रेस पक्षाच्या या विचाराची आज मोठी गरज आहे. तालुक्यातील दररोज दोन गावांमध्ये जनसंवाद यात्रा नेली जात आहे. याद्वारे जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यावर आपला भर असल्याचे ते म्हणाले.
बैठकीनंतर आ. कानडे यांनी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वडाळा महादेव येथील ज्ञानेश्वर पवार व सुनील पवार या तरुणांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच आ. कानडे यांनी वडाळा महादेव येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर या शाळेस भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधत शाळेसंबंधी माहिती घेतली.
मुख्याध्यापिका भाग्यश्री आघाडे यांनी आ. कानडे यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी कैलास पवार, भाऊसाहेब राठोड, दादासाहेब झिज, सर्जेराव कसार, ज्ञानेश्वर पवार, पाराजी गोंदकर, किशोर महाले, भरत पवार, विशाल कांबळे, कृष्णा पवार, सचिन पवार, आबा पवार, प्रदीप कसार, प्रदीप वाघ, भाऊसाहेब अभंग, मनोज गवळी, निपाणीवाडगाव ग्रामपंचायत सदस्य अक्षय राऊत, अजीम पठाण, मौलाना रशीद बागवान, ग्रामसेवक उंदरे, बाळासाहेब खाडे, वसंतराव खाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.