अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नवी दिल्ली : ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे भारतीय सैन्याचे नवे लष्करप्रमुख होणार आहेत. नरवणे यांच्या रूपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्व्वोचपदी विराजमान होणार आहे. सध्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
नरवणे हे मूळचे पुण्याचे आहेत. ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेल्या मनोज नरवणे यांनी एनडीएमधील प्रशिक्षणानंतर डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीत प्रशिक्षण घेतले. त्यानंतर जून १९८० मध्ये ते ७ शीख लाइट इन्फंट्रीमधून लष्करात दाखल झाले.
लष्करातील प्रदीर्घ सेवेत त्यांनी ‘आसाम रायफल्स’चे महानिरीक्षक, जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. म्यानमारमध्ये त्यांनी भारताचे डिफेन्स अटॅची म्हणून काम केले आहे. काही महिन्यांपूर्वी लष्करात झालेल्या बदलांमध्ये लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांना लष्कर प्रशिक्षण कमांडच्या प्रमुखपदावरून कोलकातास्थित पूर्व कमांडच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
नरवणे परिवार मूळचा पुण्याचा असून त्यांचे वडील मुकुंद हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्या आई सुधा या प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणीच्या निवेदक होत्या, तर मनोज यांच्या पत्नी वीणा यांनी नरवणे यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.