महाराष्ट्र

मोठी बातमी ! राज्यातील उपाहारगृहे, दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळ मर्यादेत होणार वाढ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Marathi news :- राज्यातून कोरोनाचा पायउतार होऊ लागला असल्याने दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता राज्य सरकारने कोविड निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

वर्षा निवासस्थानी राज्यातील टास्क फोर्सची आज मुख्यमंत्र्यांसोबच सविस्तर चर्चा झाली. यावेळी राज्यातील उपहारगृहे, दुकानं आणि अम्युझमेंट पार्कविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच, लहान मुलांसाठीच्या लसीकरणाबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू

कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडेदेखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होताना दिसते. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत.

उपाहारगृहे व दुकाने यांचीदेखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी तयार राहण्याची सूचना

मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्राच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे तसेच याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास केल्या.

मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे

दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धूत राहणे खूप आवश्यक आहे,

असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.तसेच याबाबतीत लोकांनी बेसावध राहू नये. यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी, असेही त्यांनी सूचित केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24