महाराष्ट्र

लग्न जुळेना, बाहेर जाण्यास बंदी, पाणी भरण्यापासून दळण दळण्यापर्यंत ! टक्कल पडलेल्या लोकांचे काय हाल होत आहेत ?

Published by
Tejas B Shelar

बुलढाणा : शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक केसगळतीच्या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजारामुळे टक्कल पडत असल्याने सामाजिक बहिष्काराची स्थिती निर्माण झाली असून, विशेषतः लग्नांसारख्या सामाजिक गोष्टींवरही परिणाम होत आहे.

सोयरीक जुळण्याचे प्रमाण शून्यावर
शेगाव तालुक्यातील बोंडगाव आणि आसपासच्या गावांमध्ये टक्कल व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. विशेषतः पुरुषांसोबत महिलांमध्येही केसगळतीचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या आजारामुळे लग्नसराईच्या काळात मुलांना आणि मुलींना मागणी येत नाही. गावकरी म्हणतात की, “टक्कल व्हायरस असलेल्या व्यक्तीला सून किंवा जावई म्हणून आणल्यास संसर्ग पसरू शकतो.” त्यामुळे सोयरीक जुळण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे.

बाहेर जाण्यासही बंदी
केसगळती झालेल्या व्यक्तींना किराणा दुकान, चक्की, सलून, दूध विक्रेते आणि भाजीवाले सेवा देण्यास नकार देत आहेत. यामुळे रुग्णांना दैनंदिन गरजा भागवण्यात अडचणी येत आहेत. एका ग्रामस्थाने सांगितले, “पाणी भरण्यापासून दळण दळण्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये अडथळा येतो. आम्हाला बाहेर जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे.”

रुग्ण संख्या वाढली
सध्या शेगाव तालुक्यातील केस गळतीच्या रुग्णांची संख्या 197 वर पोहोचली आहे. 20 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला, तरीही या आजाराचे नेमके कारण समजलेले नाही. स्थानिक आरोग्य विभाग, आयुष मंत्रालय आणि आयसीएमआरच्या पथकांनी तपासणीसाठी ठाण मांडले असून विविध प्रकारचे नमुने गोळा केले जात आहेत. मात्र, अद्याप अहवाल आलेला नाही.

आरोग्य यंत्रणा हतबल
दिल्लीहून आलेल्या डॉक्टरांच्या पथकालाही या आजाराचे निदान करण्यात यश आलेले नाही. आयसीएमआर आणि आयुष मंत्रालयाच्या पथकाकडून केस गळतीची कारणे शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांनी लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

टक्कल व्हायरसचा शोध घ्या
गावकऱ्यांनी सरकारकडे तातडीने या समस्येवर उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थ म्हणतात की, टक्कल व्हायरसचा शोध घेऊन या संकटातून मुक्तता करावी. अन्यथा, सामाजिक आणि आर्थिक जीवनावर गंभीर परिणाम होईल.सद्यस्थितीत आरोग्य पथकांच्या तपासणीचा अहवाल येईपर्यंत गावकऱ्यांनी धीर धरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, या आजारामुळे सामाजिक संकट उभे राहिल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com