Maharashtra News : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्र विकास आघाडी (मविआ) च्या सरकारच्या ३० महिन्यांच्या सत्ता काळात राज्यात १८ लाख ६८ हजार ५५ नवीन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग स्थापन झाले.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील ही कामगिरी यापूर्वीच्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पाच वर्षांच्या सत्ताकाळापेक्षा साडेचार लाखाने जास्त आहे, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केला.
माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीत हे समोर आले असून आताच्या बोलघेवड्या सरकारपेक्षा देखील मविआची कामगिरी सर्वच आघाड्यांवर सरस होती, असेही त्यांनी म्हटले आहे.
पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन माहितीच्या अधिकारात मिळालेली ही माहिती देत सरकारवर चांगलीच टीका केली. मविआ सरकारने कोरोनाचे दोन वर्षांचे भीषण संकट, विविध षडयंत्रे यावर मात करत ही चांगली कामगिरी केली आहे.
उठसूट ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारवर टीका करणाऱ्यांना आता ही मोठी चपराक आहे, असा हल्लाबोलही पटोले यांनी केला आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन पाच वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात १४ लाख १६ हजार २२४ नवीन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग स्थापन झाले, अशी आकडेवारी देऊन पटोले पुढे म्हणाले,
रोजगाराच्या आघाडीवरही मविआ सरकारच्या ३० महिन्यांच्या काळात ८८ लाख ४७ हजार ९०५ नोकऱ्या निर्माण झाल्या. हे प्रमाणही फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील नोकऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे.
मविआ सरकार पाडल्यानंतर नवीन उद्योगांची संख्या ८ लाख ९४ हजार ६७४ वरून ७ लाख ३४ हजार ९५६ वर घसरली आणि नवीन रोजगाराच्या संधीदेखील ४२ लाख ३६ हजार ४३६ वरून २४ लाख ९४ हजार ६९९ एवढी कमी झाली.
जेव्हा कोरोना महामारी शिगेला पोहोचली होती तेव्हा राज्यात ६ लाख २१ हजार २९६ नवीन उद्योगांची नोंदणी झाली होती, ज्या माध्यमातून ४४ लाख ६० हजार १४९ रोजगार निर्मिती झाली. मविआ सरकारने हे सर्व विविध संकटांचा सामना करत केले, असेही पुढे पटोले म्हणाले.