अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- एसटी संपाचा तिढा कायम आता असताना एक महत्वाची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे एसटीचा खासगीकरणाकडे प्रवास सुरू असल्याचे संकेत मिळू लागले आहे.
गेल्या काही वर्षांपासून तोटय़ात गेलेली एसटी नफ्यात आणण्यासाठी एसटीच्या खासगीकरणाचा पर्याय पुढे आला असून, याबाबत अभ्यास करण्यासाठी ‘केपीएमजी’ या खासगी संस्थेची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे.
आर्थिक संकटामुळे गटांगळ्या खात असलेल्या एसटी महामंडळाला त्यातून बाहेर काढण्याबाबत सल्ला देण्यासाठी एसटी महामंडळाने केपीएमजी संस्थेची नेमणूक केली आहे.
खासगीकरण करायचे की उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधायचे, याचा सल्ला ही संस्था देईल. त्यानंतर पावले उचलली जातील, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अनिल परब यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरण वगळता इतर सर्व मागण्या मान्य केल्यानंतरही कर्मचारी आपल्या भूमिकेवर अडून बसले आहेत.
त्यांची विलिनीकरणावरची भूमिका ठाम असल्यामुळे उच्च न्यायालयाने नेमलेल्या कमिटीनुसार ते विलिनीकरण बाबतीत निर्णय घेणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आपण कोणत्या पर्यायांचा वापर करू शकतो.
याबाबत आम्ही चर्चा केल्या आहेत. तसेच या तपासाची सूचना मी आमच्या कन्सल्टन्सी कंपनीला दिली आहे. एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि खर्चाबाबात चर्चा केल्याची अनिल परबांनी माहिती दिली आहे.
तसेच उपलब्ध पर्यायांमध्ये खाजगीकरण हा सुद्धा एक पर्याय आहे. परंतु एसटीच्या खाजगीकरणाचा कुठलाही विचार अद्यापही केला नाही. सरकार म्हणून देखील लोकांची जबाबदारी आमच्यावर आहे.