अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत भर पडली आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून दिल्लीच्या
न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात पुढील ७ दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचा दावा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केलाय. त्यांनी ट्वीट करत हा दावा केला आहे.
दरम्यान मुंबई पोलीस मलिकांना कधी अटक करते याची सर्व देश वाट पाहत असल्याचं कंबोज यांनी म्हटलंय. मोहित कंबोज म्हणाले, “समीर वानखेडे यांनी महाराष्ट्रातील मंत्री असलेल्या बिघडलेल्या नवाबांविरोधात केंद्रीय अनुसुचित जाती आयोगाकडे अॅट्रोसिटी कायद्यानुसार तक्रार केली होती.
दिल्लीच्या न्यायालयाने मुंबई पोलिसांना पुढील ७ दिवसात मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिलेत.
त्यांनी मागील ४ महिन्यात वानखेडे कुटुंबाविरोधात अनेक आरोप केले.” एका मंत्र्याने आपल्या पदाचा गैरवापर करत जातीच्या आधारावर भारताच्या प्रामाणिक अधिकाऱ्यावर आरोप केले.
त्याची दखल घेऊन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आम्ही या आदेशाचं स्वागत करतो. आता मुंबई पोलीस नवाब मलिकांविरोधात कधी गुन्हा दाखल करते हे पाहणार आहोत,” असं मोहित कंबोज यांनी म्हटलं.