दूध भेसळ रोखण्यासाठी मंत्र्यांचा नवा प्लॅन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 ऑगस्ट 2020 :- दुधाला वाढीव दर मिळावा यासाठी विविध शेतकरी संघटनाचे राज्यात आंदोलन सुरू आहे. यामध्ये भेसळयुक्त दूध रोखण्याची एक मागणी आहे. राज्यात भेसळयुक्त दुधाचे प्रमाण वाढले असून ग्राहकांची फसवणूक होत आहे.

यासाठी राज्य सरकारने यासाठीचा उपाय म्हणून भेसळयुक्त दुधावर छापे टाकण्याची मोहीम आखली आहे. यासंबधी राज्यभर तपासणी करण्यात येणार असून दुग्धविकास मंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री दत्तात्रेय भारणे हेही यामध्ये सहभागी होणार आहेत.

शेतकरी संघटनेच्या सूकाणू समितीचे अनिल देठे पाटील यांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. त्यानुसार मंत्री केदार यांनी आता अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले आहेत.

दुग्धव्यवसाय विकास आणि अन्न व औषध प्रशासन विभाग संयुक्तपणे ही कारवाई करणार आहेत. भेसळ आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई होईल आणि दुधात नीळ टाकून ते पिण्यासाठी पाठविले जाणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल.

या मोहिमेत मराठवाडा भागात मंत्री केदार तर पश्चिम महाराष्ट्रात राज्यमंत्री भरणे सहभागी होणार आहेत. याशिवाय ठिकठिकाणी अधिकाऱ्यांची पथके कारवाई करणार आहेत.

राज्य सरकारने असा धाडसी निर्णय घेतल्यास दूध दराबाबतच्या समस्यांचे समूळ उच्चाटन होऊन ग्राहकांना देखील शुध्द व गुणवत्तापूर्ण दूध मिळेल,’ अशी मागणी देठे पाटील यांनी सरकारकडे केली होती.

राज्यात दररोज १ कोटी ३० लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. यापैकी ९० लाख लिटर दुधाची बंद पिशवीतून विक्री होत होती. तर २५ लाख लिटर दुधापासून दूध भुकटी (दूध पावडर) तयार केली जात होती.

१५ लाख लिटर दुधापासून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती होत असे. परंतु करोना संकटामुळे राज्यातील हॉटेल्स, मिठाईची दुकाने बंद आहेत. राज्यात ५५ हजार टन दूध भुकटीही पडून आहे. यामुळे दुधाच्या मागणीत मोठी घट झाली.

त्यातून साधारण ५० लाख लिटर दूध अतिरिक्त ठरले. यामुळे दूध खरेदी दरावर मोठा परिणाम झाला. खरेदीदरात प्रतीलीटर ३२ रूपयांवरून थेट १७ ते १८ रुपयांपर्यंत घसरण झाली.

या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी या व्यवसायात चांगले दिवस आणायचे असतील तर राज्य सरकारने सर्वांत प्रथम दूध शितकरण, निर्जंतुकीकरण व प्रोसेसिंगच्या नावाखाली दुधात होणारी भेसळ तसेच टोण्ड दूध व डबल टोण्ड दुधावर कायमचीच बंदी घालणे आवश्यक आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे दुधजन्य पदार्थ बनविणे बंद आहे. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने दुधाच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. दिवसेंदिवस दुधाची मागणी घटली आहे. अशात दर कोसळल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24