आमदार किरण लहामटे म्हणतात चार महिन्यात ७० कोटींची कामे झाली !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- गत चार महिन्यात अकोल्यात ७० कोटी रुपयांची कामे मार्गी लावली असून, भविष्यात तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे आ. किरण लहमटे यांनी सांगितले. अकोले येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत आ. लहामटे बोलत होते.

ते म्हणाले, अर्थसंकल्पात कर्जमाफीचे १२० कोटी रुपये तालुक्यास मिळाले आहेत. अतिवृष्टीचे २० कोटी रुपये तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. एमआयडीसीबाबतचा मुद्दा हा आमच्या ब्लू प्रिंटमधील असून, तो लवकर सोडविणार असल्याचे व त्यात अर्थमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी विशेष लक्ष घातले असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांच्याकडे तालुक्याचे १२ महत्वाचे प्रश्न मांडले असून, त्यांनी त्यास हिरवा कंदील दिला आहे. पर्यटन विकासाबाबत आपण लक्ष घालणार आहोत. शेतकऱ्यांसाठी १२ तास वीज उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी प्रयत्नशील आहे.

आमदार निधीतील तीन कोटींमध्ये रस्ते, वीज, कुमशेतचा रस्ता, पिंपरकणे पूल आदी प्रश्न अग्रक्रमाने सोडविणार असल्याचे ते म्हणाले. तालुका टँकरमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून, आदिवासी भागातील उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणार आहे.

तालुक्यातील भूमिहीन, धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देऊन शहापूर- देवराई रस्त्याचा पाठपुरावा करणार आहे. तालुक्यातील सामान्य जनता व माझा यापुढे थेट संवाद राहणार असून, आमदार राहुटीचा कार्यक्रम राबविणार आहे.

पठार भागातील जनतेसाठी जनता दरबार घेणार असून, त्यांचे प्रश्न सोडविणार आहे. पक्षविरहीत भरपूर लोकांनी मला मदत केली आहे. त्यामुळे सर्वात शेवटचा माणूस मला फार महत्वाचा वाटतो. निळवंडेबाबत अकोले तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाही.

वन चक्कीला जमिनी देणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना कंपनीने फसविले असून, त्यांचे अधिकारी दादागिरी करीत असल्यास त्यांचा लवकर बंदोबस्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तोलारखिंड, देवीचा घाट, औद्योगिक वसाहत, ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा, अप्पर आंबित, बिताका प्रकल्प, कळसूबाई रोपवे, पर्यटन विकास, पट्टाकिल्ला, पिंपरकणे उड्डाण पूल आदी तालुक्यातील १२ महत्वाच्या कामांची यादी शरद पवार यांना दिली आहे.

पिंपळगाव खांड धरणाचे पहिले आवर्तन आज सोमवारपासून सुटणार आहे. त्यापुढे १० ते १५ मे दरम्यान दुसरे आवर्तन सोडण्यात येईल. आवर्तन कालावधीत पाण्याची नासाडी होणार नाही, यासाठी लक्ष देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com+

अहमदनगर लाईव्ह 24