अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : पारनेर नगरपंचायतीतील त्या पाच नगरसेवकांनी पुन्हा बुधवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे आमदार निलेश लंके यांनी पाच जणांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नेले. यापुढे हे सर्व नगरसेवक आ. लंके यांच्याच नेतृत्वाखाली काम करतील. त्याचबरोबर पारनेर तालुक्यामधील महाविकास आघाडीची धुरा सुद्धा त्यांच्यावरच असेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आ. निलेश लंके यांच्या नेतृत्वावर एक प्रकारे सुतोवाच केला.
पारनेर नगर पंचायतीच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. यामुळे महाविकास आघाडी मध्ये आलबेल नाही अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान याचा फायदा विरोधकांना होऊ नये या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार आमदार निलेश लंके हे पाचही नगरसेवकांना घेऊन बुधवारी मुंबईत आले. अगोदर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आ. लंके शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत नगरसेवकांना घेऊन मातोश्रीवर पोहोचले. त्याठिकाणी जवळपास चाळीस मिनिटे बैठक चालली. नगरसेवकांनी स्थानिक शिवसेना नेतृत्वाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर यापुढेही आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यानुसार पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार म्हणून लंके यांच्याकडे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यापुढेही त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाविकास आघाडी कायम आबाधित राहिल. त्यासाठी स्थानिक पातळीवर सुद्धा आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
निलेश तुला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले
या पाठीमागे जे काही झाले असेल ते सोडून द्या. आता आपण महाविकास आघाडीत काम करत आहोत. निलेश तू आपला घरचा माणूस आहे. तुझे काम सुद्धा खूप चांगले आहे. तुला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. कधीही कोणतेही काम घेऊन तू मला भेटायला येऊ शकतोस असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगतात. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले आ. लंके भावूक झाले.
साहेब माझ्या हातात आजही शिवबंधन…
आमदार निलेश लंके यांनी शिवसेना, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आणि भगवा या प्रती असलेली आस्था आणि प्रेम मातोश्रीवर व्यक्त केली. मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. साहेब माझ्या हातात आजही शिवबंधन आहे. असे आमदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. तु उद्याचा शिवसेनेचा उमेदवार सुद्धा असू शकतो. असे उद्धव ठाकरे यांनी सांगतात एकच हशा पिकला. साहेब आपण जो आदेश द्याल तसे काम करू असे उत्तर आमदार निलेश लंके यांनी देताच ठाकरे यांनी स्मित हास्य करत समाधान व्यक्त केले.
कित्येक वर्षानंतर मातोश्रीचा वेळ मिळाला
आमदार निलेश लंके हे कट्टर शिवसैनिक मानले जात असत. शाखाप्रमुख ते तालुकाप्रमुख असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. शिवसेनाप्रमुखांना देव मानणाऱ्या आमदार निलेश लंके यांना कधी मातोश्रीवर येता आलं नाही. तशा प्रकारची संधी त्यांना मिळाले नाही. त्यांची ही इच्छा तब्बल दोन दशकांनंतर बुधवारी पूर्ण झाली. मातोश्रीवर त्यांना उद्धव ठाकरे तब्बल पाऊण तास वेळ दिला. आनंद त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews