अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- मंत्रिपदापेक्षा मतदारसंघाचा विकास मला महत्त्वाचा वाटतो. मी ठरवले असते, तर तालुक्याला लाल दिव्याची गाडी नक्कीच मिळवली असती, असे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत साठ हजार मतांनी विजय संपादन केल्याबद्दल लंके यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार विजय औटी यांचे वर्चस्व असलेल्या पारनेर शहरात त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार लंके म्हणाले, मंत्रिपदापेक्षा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवणे महत्त्वाचे आहे. मंत्रिपद घ्यायचेच असते,
तर माझ्याकडे असलेल्या जादूच्या कांडीच्या मदतीने ते मिळवलेही असते. पक्षाच्या सर्व आमदारांमध्ये पवार कुटुंबाच्या गळ्यातील ताईत तुमचाच आमदार असेल.
शरद पवार, अजित पवार, तसेच सुप्रिया सुळे यांच्याकडे आग्रह धरला असता, तर लाल दिव्याची गाडी आपल्यासाठी दूर नव्हती, असा दावा आमदार लंके यांनी केला. मंत्रिपद घेतले असते, तर मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले असते.
पुढील निवडणुकीत तुम्हीच नीलेश लंके हटावचे फलक लावले असते, अशी मिश्किल टिपण्णी करून मायबाप जनतेला दररोज पाहण्याची मला सवय लागली आहे.
विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी दहा-बारा दिवस मतदारसंघाबाहेर होतो, त्यावेळी माझ्यासह जनता वेडी झाली होती. माझ्यासाठी मायबाप जनता हेच सर्वस्व असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.