जामखेड प्रतिनिधी :-शरद पवार यांचे नातू रोहित पवार कर्जत – जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेनंतर आणि लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास अवधी असतानाच पालकमंत्री राम शिंदे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे.
पालकमंत्री शिंदे यांनी विधानसभेची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. याचे कारण म्हणजे कर्जत, जामखेड तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी उभे करण्याची मागणी केली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनेक जण उभे राहिले होते. त्याचा फायदा शिंदे यांना झाला. या वेळी तशी परिस्थिती होऊ नये म्हणून सर्व विरोधी पक्षनेते एकत्र आले आहेत.
कुठल्याही प्रकारची वाच्यता न करता तीन दिवसांपूर्वी चोंडी येथील आपल्या बंगल्यावर शिंदे यांनी प्रमुख पदाधिकारी व शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक घेतली.
या बैठकीत मतदारसंघात झालेल्या विकासकामांचा आढावा घेऊन केलेल्या कामांचे फलक गावोगावी लावण्याचे आदेश देण्यात आले.
लोकसभेसाठी भाजपचे डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यातील लढत रंगतदार झाली. निवडून कोण येणार, लीड किती मिळणार याची चर्चा सुरू असतानाच पालकमंत्री शिंदे यांनी काही निवडक पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतली.
या बैठकीत २८ शक्ती केंद्रप्रमुखांना प्रत्येकी पाच बूथची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी प्रत्येक गावात जाऊन गावातील झालेल्या विकासकामांचा आढावा घ्यायचा आहे.
त्याच प्रेमाने त्या भागात जी विकासकामे कामे झाली आहेत त्यांची यादीच मंत्री शिंदे यांनी तयार केली आहे. ती सर्वांना देण्यात आली.
यामध्ये जलसंधारण, पेयजल योजना, मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान आवास योजना, राष्ट्रीय पेयजल, रमाई आवास, शौचालय, उज्ज्वला गॅस,
तांडा वस्ती, सभामंडप, कुकडीचे पाणी, पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय यांचा समावेश आहे.
प्रत्येक गावात जाऊन यातील किती कामे झाली, किती होणे बाकी आहे याची माहिती गोळा करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहेत.