कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने समन्स बजावले आहे. रोहित पवार यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी विनंती करणारी एक याचिका भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांनी दाखल केली असून या याचिकेवरूनच खंडपीठाने आज रोहित पवार यांना समन्स बजावले.
रोहित पवार यांनी निवडणुकीत मतदारांना प्रत्येकी एक हजार रुपये वाटले, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी याचिकेत केला आहे. याशिवाय रोहित पवारांनी निवडणूक खर्चही लपवला, निवडणुकीत बारामती अॅग्रोच्या कर्मचाऱ्यांचा गैरवापर केला,
सोशल मीडियात हेतूपुरस्सर राम शिंदेंची बदनामी केली, असे अनेक आरोप याचिकेत करण्यात आले आहेत. राम शिंदे यांच्या याचिकेची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रोहित पवार यांना नोटीस बजावली आहे.
राम शिंदेंनी याचिकेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी निवडणुकीच्या नियमांचा भंग केल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. ‘निवडणुकीच्या काळात रोहित पवार यांनी त्यांच्या साखर कारखान्यातल्या १०० कर्मचाऱ्यांच्या वापर करुन पैशांचं वाटप केलं.
यापैकी अनेक कर्मचाऱ्यांना आपण त्यावेळीच रंगेहात पकडून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं होतं,’ असं राम शिंदेंनी याचिकेत नमूद केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत नगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघातील लढत महाराष्ट्रात सर्वात लक्ष्यवेधी ठरली होती. माजी मंत्री व भाजपचे नेते राम शिंदे यांच्यापुढे रोहित पवार यांनी आव्हान उभे केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही लढत प्रतिष्ठेची केली होती. या लढाईत रोहित पवार यांनी बाजी मारत राम शिंदे यांना पराभवाचा धक्का दिला होता.