अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही. त्यामुळे इच्छुकांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता प्रचंड ताणलेली आहे.
मला जर मंत्रीपदाची संधी मिळाली तर त्याचं सोनं करेन, अशी इच्छा आमदार रोहित पवार यांनी बोलून दाखवली आहे.
रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामांसाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला.
बैठकीनंतर त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी मंत्रिमंडळात संधी दिली तर सोनं करेन, अशी इच्छा बोलून दाखवली.
‘काम करणाऱ्यांना संधी दिली पाहिजे, अशी लोकांची इच्छा असते. बोलणारे बोलतच असतात, पण मी सामाजिक आणि व्यावसायिक कामं करतो.
मंत्रिमंडळात संधी देण्याचा निर्णय हा पक्षाचा आहे, पण ती संधी मिळाली, तर त्याचं सोनं करू, असा विश्वास रोहित पवार यांनी बोलून दाखवला आहे.
“पक्ष कोणाही एकाचा नसून तो चालवताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. आपल्याला आवडण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. मला कितीही वाटलं संधी मिळावी तरी पक्षाची काही समीकरणं असतात. पण जर मला संधी मिळाली तर त्याचं सोनं करेन,” – आ. रोहित पवार