अहमदनगर :- शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नेता सुभाष चौकात लावलेला स्वागताचा फलक चोरी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आज कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
हा चौक शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांचा बालेकिल्ला मानला जात असून आगामी काळात आ. जगताप-उपनेते राठोड यांच्यात संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
आ. संग्राम जगताप यांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, ‘शहरात आचार्य सम्राट डॉ. शिवमुनीजी महाराज साब व युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज साब यांचे धार्मीक कार्यक्रमानिमित्त नगर शहरात आगमन झाले आहे.
महाराज साधारणपणे २० वर्षानंतर नगरशहरात येत आहे. त्या अनुषंगाने नवीपेठ जैन स्थानक नेता सुभाष चौक परिसर येथे त्यांच्या स्वागताचा फलक लावला होता.
पण त्या भागातील काही गलीच्छ राजकीय पुढा-यांनी तो फलक काढून स्वतःचे राजकीय हेतु साध्य करण्यासाठी स्वतःचा फलक लावला आणि माझा फलक त्या ठिकाणाहून गायब करून चोरुन नेला,
ही घटना मला कळली असता. माझ्या धार्मीक भावना दुखावल्या आहेत. तरी याबाबत संबंधित दोषींवर त्या परिसरातील सी.सी. टिव्ही फुटेज तपासून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रार अर्ज मध्ये करण्यात आली आहे.