अहमदनगर – राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भूकंप झाला. त्याचे धक्के राष्ट्रवादी कॉग्रेसला मोठ्या प्रमाणात बसले. राजकीय विश्वच हादरून गेले. त्याला कारणही तसेच आहे.
भाजपाने राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदाची अजित पवार यांनी शपथ घेतली. सत्तास्थापनेवेळी अजित पवार यांच्या बरोबर राष्ट्रवादीतील 11 आमदार गेल्याचे सांगण्यात येत होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावून घेत आपण कोणा बरोबर आहात हे मिडियासमोर बोलायला लावले. त्यामुळे अजित पवार यांच्या बरोबर गेलेले आमदार मोठ्या साहेबांच्या गोटात आले आहेत. काही आमदार नॉट रीचेबल आहेत.
दरम्यान अहमदनगरचे काही आमदार अजित पवार यांच्या बरोबर असल्याची चर्चा होती. परंतु नगरच्या सर्व आमदारांनी वाय बी चव्हाण सेंटरला हजेरी लावत आम्ही मोठ्या साहेबांसोबत असल्याचे दाखवून दिले.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार, संग्राम जगताप, निलेश लंके, प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे हे सहा आमदार आहेत.
हे सर्व आमदार शरद पवार साहेबांसोबत असल्याचे फोटो त्याच्या समर्थकांनी व्हायरल केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.