दारूबाबत ‘या’ सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा सरकारला घरचा आहेर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- कोरोनाच्या काळात दारुची विक्री करू नये. त्यामुळे कोरोना वाढण्याची भीती आहे. त्यामुळे दारूविक्री बंद करावी, अशी मागणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

किमान अकोले मतदारसंघात तरी दारुविक्रीचा निर्णय मागे घ्यावा, असे म्हटले आहे. लाॅकडाऊनच्या काळात दारुबंदी उठवून सरकारने गर्दी वाढविली. दारु पिवून काही लोकांनी पत्नीसोबत भांडणे केली.

नगर शहरात दारू पिवून आलेल्या पतीने मारहाण केल्याने एका महिलेने दोन मुलांसह विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अशा गोष्टींमुळे राजकीय नेतेही व्यथित होऊ लागले आहेत.

डाॅ. लहामटे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही त्यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे समाजातून काैतुक होत आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात लहामटे म्हणाले की, माझ्या मतदार संघात दोन दिवसांपासून दारूची दुकाने सुरू झाली आहेत. तेथे मजूरवर्ग, सर्वसाधारण वर्ग रांगेमध्ये उभे आहेत.

रेशन दुकान व जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांपेक्षाही जास्त गर्दी दारुच्या दुकानासमोर होत आहे. लांबच्या लांब रांगा आहेत. यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येतो.

तसेच या मद्यपींमुळे त्यांचे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत असून, परिसरातील वातावरणही दूषित होत आहे. त्यामुळे हे कौटुंबिक अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या काळात न परवडणारे आहे.

सर्व बाबींचा विचार करून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जणतेचे सर्वदृष्टया आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी माझ्या मतदार संघातील दारूबंदी तशीच ठेवावी, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24