गोदावरी उजव्या कालव्याच्या टेल भागात तातडीने पाणी सोडा : कोल्हे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : चालु पावसाळी हंगामात गेल्या अडीच महिन्यापासून पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांकडील पशुधनाला प्यायला पाणी नाही. नाशिक, इगतपुरी, घोटी भागात पावसाचे पर्जन्यमान बऱ्यापैकी आहे.

त्यामुळे दारणा- गंगापूर धरणे ८० टक्क्याच्यावर भरली आहेत. गोदावरी कालव्यांना नागरिकांना तसेच जनावरांचे पिण्यासाठी पाणी सोडावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मंत्रालयीन स्तरावर केलेली आहे.

गोदावरी उजव्या कालव्या टेलच्या चितळी, जळगाव भागात तात्काळ पाणी सोडावे, अशी मागणी येथील लाभधारक शेतकरी गंगाधर भिवा चौधरी यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.

याबाबत चौधरी यांनी म्हटले आहे की, तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चालु पावसाळी हंगामात कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे कार्यक्षेत्रात तसेच अहमदनगर जिल्हयात पाऊसच नाही. त्यामुळे नागरिकांचे तसेच जनावरांचे पिण्याचे पाण्याचे हाल होत आहे. याबाबतची नेमकी वस्तुस्थिती सांगुन गोदावरी कालव्यांना पाणी सोडावे म्हणून मागणी केलेली आहे.

गोदावरी नदीस पाणी न सोडता बारमाही गोदावरी कालवे लाभक्षेत्रास पाणी सोडण्यात यावे, जेणेकरून या कालव्यावर अवलंबुन असलेल्या विविध पिण्याच्या पाणी योजना तसेच जनावरांच्या पिण्याचे पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होऊन शासनाचा टँकरवरील खर्च वाचणार आहे. तसेच कालवा लाभक्षेत्रात पाणी सुटले तर त्याचा फायदा परिसरातील विहीरींना होऊन या शेतकऱ्याकडील पशुधनास काही प्रमाणात पाणी उपलब्ध होईल.

सध्या चितळी, जळगाव त्याचप्रमाणे पुणतांब परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी टॅकर सुरू आहेत. जनावरांना पिण्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासते, शेतकऱ्याकडील पशुधन अडचणीत आले आहे. तेंव्हा या सगळ्या गोष्टींचा शासनाने व जलसंपदा विभागाने प्राधान्याने विचार करून तात्काळ गोदावरी उजव्या कालव्याच्या टेल भागात पाणी सोडावे, असेही गंगाधर चौधरी म्हणाले.