अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न गाजत असताना बुधवारी नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने औरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसवर छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक चिकटवण्यात आले.
याप्रसंगी सुमित वर्मा म्हणाले, औरंगाबादच्या नामांतरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकारही बोटचेपीची भूमिका घेत आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार करता संभाजीनगर हे नाव होणे गरजेचे आहे.
आज अनेक योजनांना, चौकांना सत्ताधारी व विरोधक आपआपल्या नेतृत्वाचे नाव देत आहेत. परंतु नागरिकांच्या भावनांचा आदर करुन ‘छत्रपती संभाजीनगर’ हे नामांतर होणे गरजेचे आहे.
याबाबत मनसेने वेळोवेळी पाठपुरवठा केला. परंतु त्याबाबत कोणताही निर्णय होत नाही. म्हणून बुधवारी नगरमध्ये औरंगाबादला जाणाऱ्या गाड्यांवर ‘छत्रपती संभाजीनगर’ नावाचे फलक चिकटवले आहेत.
याची दखल घेऊन लवकरात लवकर नामांतर व्हावे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी सुमित वर्मा यांनी दिला.
याआंदोलनात प्रसंगी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, अनिकेत शियाळ, संकेत जरे, सुमित शिर्के, हामजा शेख, दीपक मगर, योगेश चंगेडिया, प्रमोद जाधव आदींसह मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.