दुकानांवरील इंग्रजी नावाच्या पाट्या मराठीत करण्यात याव्यात, याबाबत मनसेच्यावतीने तोफखाना पोलिस स्टेशनचे सहा.पो.नि. नितीन रणदिवे व जे.सी.मुजावर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मनसे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशिनकर, महिला जिल्हाध्यक्षा अॅड. अनिता दिघे, शहर सचिव डॉ. संतोष साळवे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे, वाहतुक सेना शहराध्यक्ष अशोक दातरंगे, शहर उपाध्यक्ष दिपक दांगट, विभाग अध्यक्ष किरण रोकडे, प्राची वाकडे, शहर उपाध्यक्ष संदिप चौधरी, संकेत व्यवहारे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी गजेंद्र राशिनकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील अस्थापने, दुकाने यांना इंग्रजी पाट्या काढून मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे, याबाबत मनसेच्यावतीने महानगरपालिका आयुक्त, कामगार आयुक्त यांना आस्थापनांना पाट्या मराठीत करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली होती.
परंतु गेल्या आठ दिवसांची मुदत संपली आहे. परंतु अनेक आस्थापने, दुकानांच्या पाट्या मराठीत झाल्या नाही, जाणिवपुर्वक याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी पुढील दोन दिवसांत या पाट्या मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा गजेंद्र राशिनकर यांनी यावेळी दिला.