अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील एकही तालुक्यात सध्या धडाचे रस्ते उरलेले नाही. निवडणुका आल्या तरच राजकारणी मंडळी रस्त्यांची कामे आग्रहाने लवकर पूर्ण करतात.
अन्यथा या खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांचा जीव गेला तरी प्रशासनला आता काही देणे घेणे राहिलेले नाही. असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दिसून येत आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोपरगाव मध्ये मनसेने नादुरुस्त रस्त्यांचा निषेध करत गांधीगिरी आंदोलन हाती घेतले आहे.
कोपरगाव नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 हा खड्डे आणि अपघातामुळे कायमच चर्चेत असतो. नगरपासून ते पुढे राहुरी व शिर्डीपर्यंत या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.
खचलेला रस्ता, जागोजागी खड्डे, साचलेला चिखल, अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी अशी रस्त्याची दुरवस्था जागोजागी पहायला मिळत आहे.
याची दखल घेत कोपरगावच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अचानक सोमवारी (ता.26) आंदोलन पुकारुन गांधीगिरी करत महामार्गावरील खड्ड्यांना गुलाल व पुष्प अर्पण करुन साष्टांग दंडवत घातला.
येत्या तीन दिवसांत शासनाला जाग आली नाही अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
या महामार्गाबाबत सातत्याने माध्यमांद्वारे आवाज उठविला जात आहे. मात्र त्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे.
अतिवृष्टीने महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. अत्यंत वर्दळीचा हा मार्ग असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.
मात्र मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. अपघातांची श्रृंखला कायम असून अनेक निरपराध लोकांचे जीव गेले आहेत.
स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना विनवण्या करून देखील या रस्त्यांची दुरुस्ती केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
याच पार्श्वभूमीवर मनसेने सोमवारी आंदोलन करत पुन्हा एकदा शासनासह प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या काही दिवसांवर दीपावलीचा सण येऊन ठेपला आहे.
त्यामुळे येत्या तीन दिवसांत शासनाला जाग आली नाही अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केले नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved