Marathi News : देशात वर्ष २०१९ ते २०२१ या तीन वर्षाच्या कालावधीत जवळपास १३.१३ लाखांहून अधिक मुली व महिला बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये केवळ महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक १ लाख ७८ हजार असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.
त्याचवेळी १८ वर्षांखालील मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण मध्य प्रदेशात सर्वाधिक असल्याचेही गृह मंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. बेपत्ता महिला व मुलींच्या एकूण आकडेवारीचा विचार केला असता मध्य प्रदेश देशात अव्वल, तर पश्चिम बंगाल व महाराष्ट्र अनुक्रमे दुसरे व तिसरे राज्य ठरते.
केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात २०१९ ते २०२१ या कालावधीत १८ वर्षांवरील १०,६१,६४८ महिला आणि त्याखालील वयोगटातील २,५१,४३० मुली बेपत्ता झाल्या. राष्ट्रीय गुन्हे रिकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) जमा केलेली ही आकडेवारी केंद्र सरकारने गत आठवड्यात संसदेत सादर केली होती.
त्यानुसार बेपत्ता महिलांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे, तर १८ वर्षांखालील बेपत्ता मुलींची संख्या मध्य प्रदेशात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात १,७८,४०० महिला, तर १३,०३३ मुली बेपत्ता झाल्या आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये मध्य प्रदेशातील १,६०,१८० महिला आणि ३८, २३४ मुलींचा समावेश आहे.
यापाठोपाठ पश्चिम बंगालमधून १,५६,९०५ महिला आणि ३६,६०६ मुली बेपत्ता आहेत. याचप्रमाणे ओडिशातून ७०,२२२ महिला आणि १६,६४९ मुली तर छत्तीगडमधून ४९, ११६ महिला आणि १०,८१७ मुली बेपत्ता झाल्या. केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्लीतून महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
देशाच्या राजधानीतून या कालावधीत ६१,०५४ महिला आणि २२,९१९ मुली बेपत्ता झाल्या तर जम्मू आणि काश्मिरातून या कालावधीत ८६१७ महिला आणि ११४८ मुली बेपत्ता झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
महिलावरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी प्रभावी योजना केल्या जात असल्याची माहिती सरकारने संसदेत दिली होती. बेपत्ता महिला व १८ वर्षांखालील बेपत्ता मुलींची एकूण संख्या विचारात घेतली तर या बाबतीतही मध्य प्रदेश देशात अव्वल येते. त्यानंतर पश्चिम बंगालचा दुसरा, तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो.