अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- वारकरी संप्रदायातील सर्वदर्शनाचार्य, भीष्माचार्य निवृती महाराज वक्ते बाबा यांचं निधन झालं आहे. ते ८९ वर्षांच्या होते. आज २१ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता शेगावजवळील त्यांच्या टाकळी या मूळ गावी त्यांनी देहत्याग केला.
त्यांच्या पश्चात २ मुले, २ मुली, ३ सुना, २ जावई, नातवंडे असा परिवार आहे. ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९३४ रोजी बुलडाणा येथे वारकरी कुटुंबात झाला.
अवघ्या ९ व्या वर्षापासून त्यांनी कुटुंबियांच्या सोबतीने मुक्ताबाई आणि पंढरीची वारी सुरू केली. वक्ते महाराज यांना वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु म्हटले जाते.
त्यांनी अखंड ज्ञानदानपरायण केले. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना शासनाचा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. दरम्यान हभप निवृत्ती महाराज वक्ते यांच्यावर २१ डिसेंबर या दिवशी दुपारी ३ वाजता टाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.