अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पाथर्डी :- भाजप तालुकाध्यक्ष निवडीच्या मुद्द्यावरून भाजप अंतर्गत तालुक्यात राजकीय हवा तापली असताना खासदार प्रीतम मुंडे यांनी तालुकाध्यक्षपदाची इच्छुक उमेदवार धनंजय बडे यांच्या संपर्क कार्यालयापुढे धावती भेट दिली.
गेल्या मंगळवारी भाजप तालुकाध्यक्ष निवडीसाठी आमदार मोनिका राजळे व पक्षनिरीक्षक प्रसाद ढोकरीकर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष निवडीसाठी बैठक झाली. खासदार डॉ. सुजय विखे गटाचे समर्थक बैठकीकडे फिरकले नाही.
एक समर्थक हजेरी लावून घाटात निघून गेला. प्रमुख पदाधिकारी विविध कारणे सांगून बैठकीपासून लांब राहिले. तालुकाध्यक्षपदासाठी इच्छुकांनी मुलाखती दिल्या.
त्यामध्ये विद्यमान अध्यक्ष माणिकराव खेडकर यांचाही समावेश आहे. प्रत्येकाने भाषणातून आमदार राजळे यांना अंतिम अधिकार द्या ते घेतील तो निर्णय मान्य करू, असे सांगितले असले, तरी काहींनी दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे.
डॉक्टर मुंडे यांनी आवर्जून काहीवेळ बडे यांच्याकडून होणाऱ्या स्वागताला वेळ दिला. अध्यक्षपदासाठी मुंडे यांचा बडे यांच्या नावाला हिरवा कंदील असल्याची भावना त्यांच्या समर्थकांची बनवून राजळे यांना गृहीत धरून राजकीय हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.