अहमदनगर –
राज्यात युती सरकारने मोठी भरीव विकास कामे केलेली आहेत. 10-15 वर्ष राज्यात सत्तेत असणार्यांना साकळाई योजना मार्गी लावता आली नाही. साकळाई योजना फक्त विखेच करु शकतात असे सांगत विखे पाटील परिवाराला संपविण्यासाठी निघालेल्यांची अवस्था आज बिकट झाली आहे.
उमेदवारीसाठी त्यांच्याकडे माणसे राहिलेली नाहीत. महाराष्ट्राचे वाटोळे राष्ट्रवादी काँग्रेसनेच केले असल्याचा घणाघाती आरोप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.
गुंडेगाव (ता. नगर) येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करताना खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, माजी खा. दादा पाटील शेळके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडेे, भापकर गुरुजी, जिल्हा परिषद सदस्या अनिता हराळ, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. विखे पाटील म्हणाले, आत्तापर्यंत 15 वर्ष सत्तेत राहणार्यांनी साकळाईचा प्रश्न सोडविला नाही. आणि तेच जर पुन्हा साकळाई योजना करणार असल्याचे बोलत असतील तर त्यांच्या सभांना जावू नका.
येणार्या साडेचार वर्षात साकळाई योजना मार्गी लावणार असल्याचे ते म्हणाले. विखे परिवाराला संपविण्यासाठी निघालेलेच आता संपून गेले आहेत. त्यामुळे मी 25 वर्ष खुर्ची सोडणार नसल्याचा विश्वासही व्यक्त केला.