MPSC Exam Timetable : एमपीएससीच्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Exam Timetable : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पुढील वर्षी, २०२४ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १६ जून २०२४ रोजी घेतली जाणार असून, राज्यसेवा मुख्य परीक्षा १४ ते १६ डिसेंबर २०२४ या कालावधीत नियोजित आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी उमेदवारांना योग्यरीतीने करता येण्यासाठी, परीक्षांचा अंदाज येण्यासाठी एमपीएससीकडून दरवर्षी संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार २०२४ मध्ये एमपीएससीतर्फे १६ परीक्षा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यामध्ये महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा अशा परीक्षांचा समावेश आहे.

संभाव्य वेळापत्रकात परीक्षेचे स्वरूप, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा महिना नमूद करण्यात आला आहे. शासनाकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, या गृहितकाच्या आधारे संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. परीक्षेद्वारे भरावयाच्या पदसंख्येबाबतचा तपशील अधिसूचना, जाहिरातीद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.

हे वेळापत्रक संभाव्य असून, त्यामध्ये बदल होऊ शकतो. तसा बदल झाल्यास त्याबाबतची माहिती संकेतस्थळावर देण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.