महाराष्ट्र

समृद्धी महामार्गलगत एमएसआरडीसीचा आहे ‘हा’प्लान! शेतकऱ्यांना काही वर्षांपर्यंत दरवर्षी मिळू शकतात एकरी 75 हजार

Published by
Ajay Patil

महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र मध्ये ज्या काही पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू आहेत त्यामध्ये रस्ते प्रकल्पांमधील सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्ग ओळखला जातो. समृद्धी महामार्गाला महाराष्ट्राचा विकासाचा महामार्ग असे देखील म्हटले जाते व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नागपूर ते मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांमधील अंतर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा महामार्ग महत्त्वाचा ठरला आहेच

परंतु शेती आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून देखील समृद्धी महामार्गाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. साधारणपणे 701 किलोमीटरचा हा महामार्ग असून आजपर्यंत या महामार्गाचे तीन टप्पे वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेले असून शेवटच्या म्हणजेच चौथ्या टप्प्याचे काम देखील आता जवळपास पूर्ण झालेले आहे.

या महत्त्वाच्या असलेल्या समृद्धी महामार्गाच्या संदर्भात  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून एक प्लानिंग तयार केला गेला असून त्यासाठीचा प्रकल्प अहवाल देखील येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये जाहीर होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 समृद्धी महामार्गलगत उभारले जाणार नवनगरे कृषीमाल प्रक्रिया उद्योग

याबाबत सविस्तर वृत्त असे की, समृद्धी महामार्गलगत विदर्भ व मराठवाड्यातील सात ठिकाणी कृषी केंद्र उभारण्याकरिता जमीन संपादन केली जात असून याकरिता 61 टक्के शेतकऱ्यांनी संमती दर्शवली आहे व यातूनच या महामार्गालगत नवनगरे तसेच कृषीमाल प्रक्रिया उद्योग व औद्योगिक वसाहती उभारण्यात येणार आहे

व यासाठीचा प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पंधरा दिवसात जाहीर होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपूर ते मुंबई या दरम्यान 18 ठिकाणी हे कृषी केंद्र व नवनगर  विकसित केले जाणार असून समृद्धी महामार्गावर असलेल्या इंटरचेंज जवळ भू संचयन करून शेतकऱ्यांच्या भागीदारीने ही नवनगरे वसवली जाणार आहेत.

विशेष म्हणजे यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात येतील त्यांना त्या जमिनीच्या मोबदल्या 30 टक्के विकसित भूखंड दिला जाणार आहे व काही शेतकऱ्यांना तर काही वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षाला एकरी 75 हजार रुपये देण्याचे देखील या प्रकल्पामध्ये प्रस्तावित आहे.

समृद्धी महामार्ग लगत वसवले जाणाऱ्या नवनगरामध्ये सर्व सोयीसुविधा असलेले आधुनिक टाउनशिप निर्माण केले जाणार असून या ठिकाणीच शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग देखील प्रस्तावित आहेत.

 कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या ठिकाणी होणार हे कृषी केंद्र?

समृद्धी महामार्ग लगत उभारले जाणारे कृषी केंद्र हे वर्धा जिल्ह्यातील केळझर आणि विरूळ नागझरी, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर( साब्रा काब्रा) आणि सावरगाव माळ,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हडस पिंपळगाव, घायगाव जांबरगाव आणि वैजापूर( धोत्रे बाबतारा) या ठिकाणी हे कृषी केंद्र असणार आहेत.

 इतकी जमीन होणार बाधित

याकरिता जवळपास लागणारी जमीन देण्याकरिता 5516 शेतकऱ्यांनी संमती दिली आहे व या सात कृषी केंद्रांकरिता 9481 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे.म्हणजे जाकरता 60 टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 30 टक्के विकसित भूखंड दिला जाणार आहे अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे.

Ajay Patil