महाराष्ट्र

Mumbai double decker bus : मुंबईत लवकरच धावणार २०० दुमजली इलेक्ट्रिक बसगाड्या !

Published by
Ahmednagarlive24 Office

Mumbai double decker bus : बराच काळ रेंगाळलेल्या दुमजली इलेक्ट्रिक – बसगाड्या आता वेगाने बस ताफ्यात येण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी १२ दुमजली बस मुंबई शहरातील रस्त्यांवर धावू लागल्या आहेत,

तर लवकरच आणखी पाच बस गाड्यांचा ताफा येणार असून या बसेस पुरवण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले आहे. त्यामुळे २०० दुमजली बस ताब्यात येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबईची शान असणाऱ्या दुमजली बसेसना पंधरा वर्षे झाल्यामुळे वयोमर्यादा संपली आहे.

त्यामुळे या बसेस ताफ्यातून बाद करण्यात येणार होत्या. मात्र दुमजली बस बंद करण्यात येऊ नयेत, अशी तमाम मुंबईकरांची मागणी होती. त्यानुसार बेस्टने दोनशे नवीन विद्युत दुमजली बस गाड्या घेण्याचा निर्णय घेतला होता व त्यासाठी निविदाही काढल्या होत्या.

त्या निविदांनुसार स्विच मोबिलिटी कंपनी बेस्टला २०० दुमजली बस पुरवणार होती. पहिली बस फेब्रुवारीपासून मुंबई शहरात धावू लागली, मात्र त्यानंतर काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे पुढील बस गाड्या येण्यास विलंब झाला.

मात्र आता या तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून जास्तीत जास्त बस पुरवण्याचे आदेश बेस्टने संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत. यानुसार लवकरात लवकर या बसगाड्या ताब्यात येतील. दोन आठवड्यांपूर्वी दहा विद्युत दुमजली बसगाड्या ताफ्यात समाविष्ट झाल्या.

मात्र आरटीओकडून बसगाड्या पास होण्यास विलंब झाला होता. आता आरटीओ पास झाल्यामुळे या बस चार दिवसांपासून मुंबई शहरात रस्त्यांवर धावू लागल्या लागल्या असून आता एकूण दुमजली बसगाड्यांची संख्या १२ झाली आहे.

या बस आता शहरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बॅकबे आगार या मार्गावर धावत आहेत. तर संध्याकाळच्या वेळेस प्रेक्षणीय स्थळ दर्शन या मार्गावर या बस धावत आहेत.

या बसगाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लक्षात घेऊन लवकरात लवकर बसगाड्या पुरवण्याचे कंत्राटदारांनी ठरवले असून पुढील आठवड्यात आणखी पाच गाड्या बस ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. या बसगाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावर धावणार आहेत.

Ahmednagarlive24 Office