Mumbai Monsoon Update : राज्यातील अनेक भागात सध्या कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक भागात उष्णतेची लाट आली आहे. यातच आता राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानुसार 24 मे पर्यंत राज्यातील अनेक भागात गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. तर आज नांदेड, लातूर आणि उस्मानाबादमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण भागात उष्णतेची लाट राहील.
हवामान खात्यानुसार कोकणात उष्णतेची लाट दिसून येईल. तर विदर्भात बुधवारपर्यंत ढगाळ वातावरण आणि पाऊस अशी स्थिती राहील. तर उर्वरित राज्यात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक शहरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. तापमानात चांगली वाढ झाली आहे. पुण्यातील शिरूरमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर अकोला आणि वर्धा येथे पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.
दरम्यान, नैऋत्य मान्सूनने अंदमान आणि निकोबारमध्ये प्रवेश केला असून त्याची प्रगती सातत्याने होत आहे. बंगालच्या उपसागरात काल मान्सूनने वेढण्यास सुरुवात केली आहे. पुढील 2-3 दिवसांत दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या आणखी काही भागात मान्सून पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मान्सून 22 मे रोजी अंदमानात दाखल होतो. मात्र यंदा मान्सून तीन दिवस आधीच अंदमानात पोहोचला.
अंदमानमध्ये शुक्रवारी मान्सूनने दणका दिला. बंगालच्या उपसागरात शनिवारी मान्सूनने विराजमान होण्यास सुरुवात केली. बंगालचा उपसागर ओलांडण्यासाठी मान्सूनला आठ दिवस लागू शकतात, त्यानंतर तो कर्नाटकात पोहोचण्याची शक्यता आहे.
मात्र, यंदा केरळमध्ये मान्सून सुरू होण्यास तीन दिवस उशीर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल राहिल्यास 1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. त्यामुळे मान्सून 7 जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचेल आणि 11 जूनपूर्वी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :- PM Mudra Yojana : काय सांगता ! अवघ्या 5 मिनिटात मिळणार आता 10 लाख रुपयांचे कर्ज , फक्त करा ‘हे’ काम