मुंबईकरांनो सावधान ! येत्या २४ तासात मुसळधारचा इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- मुंबईत येत्या काही तासांत ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस होणार असल्याने सतर्कतेचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रचंड वेगाने वारे वाहणार असल्याने वांद्रे-वरळी सी-लिंक बंद करण्यात आला आहे.

तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरु आहे.

या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आज दिवसभर सुरु असलेल्या या पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत केलं आहे.

मात्र, धोका अजूनही टळलेला नाही. कारण मुंबईतील हा पाऊस पुढचे आणखी 24 तास पडणार असून काही भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तसेच चक्रीवादळाने सकाळपासून रौद्ररुप धारण केलेल्या राज्यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी आहेत.

मुंबईवरील वादळाचा धोका अजून टळलेला नसल्याने मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24