अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नाशिक :- पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा वार करून तिची हत्या करत, पतीने वाहनाखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. चारित्र्याच्या संशयातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
चांदवड तालुक्यातील दहेगाव येथे मंगळवारी (दि. २८) ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. चांदवड तालुक्यातील दहेगाव येथील शेतकरी नितीन बकाजी कडनोर (वय ४२) हा त्याची पत्नी सुनीता (वय ३७) हिच्याशी किरकोळ कारणावरून घरात कायमच वाद घालत असे.
अनेक वर्षांपासून त्याचे पत्नीशी वाद होते. अनेकदा त्यांचे कडाक्याचे भांडणदेखील झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून नितीनने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
सुनीता सकाळी घरकाम आटोपून दहेगाव शिवारातील लकडे मळा, पाटसरी येथे स्वत:च्या शेतात कांदा लागवडीसाठी मजूर येणार असल्याने लगबगीने शेतात गेली होती.
ती शेतात कांद्याचे रोप उपटत असताना पाठीमागून नितीनने अचानक तिच्या डोक्यात व मानेवर कुऱ्हाडीने सपासप वार केले. वर्मी घाव लागल्याने सुनीता जागीच गतप्राण झाली.