नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या चार जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यात नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे. यासोबतच मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा ही समावेश आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या वतीने ८ मे रोजी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील नाशिक विभाग व मुंबई या दोन शिक्षक आणि मुंबई व कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांचा कार्यकाळ ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे.

ते लक्षात घेऊन या चार रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात येत आहे. येत्या १५ मे रोजी या निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. २२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्जाची छाननी २४ मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात होणार आहे.

तर उमेदवारी माघारीची अंतिम मुदत २७ मे आहे. या चारही मतदारसंघाकरिता १० जून रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. १३ जून रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. नाशिक विभागीय शिक्षक विधान परिषद मतदार संघासाठी नाशिक विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळ गाव, नंदुरबार हे जिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून सध्या किशोर दराडे विधान परिषदेचे सदस्य आहेत.

नगर जिल्ह्यातील शिर्डी व अहमदनगर या दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे. लोकसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया संपन्न होताच दोन दिवसानंतर जिल्हा प्रशासन पुन्हा एकदा विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने इलेक्शन मोडवर जाणार आहे.

चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर १० जून रोजी विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान आणी १३ जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तोपर्यंत निवडणुकीचा फिवर जिल्ह्यासह नाशिक विभागात रहाणार आहे.