संकट काळात राष्ट्रवादी पक्ष जनतेच्या पाठीशी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : पुरोगामी विचार व विकासाचा अजेंडा घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळे असतित्व निर्माण केले. संकट काळात जनतेच्या पाठीशी राष्ट्रवादी पक्ष नेहमीच उभा राहिला आहे.

कोरोनाच्या संकटकाळात कोकणात आलेल्या चक्रीवादळाने अनेक नागरिक उघड्यावर आले. त्यांचे आश्रू पुसण्यासाठी शरद पवार साहेब स्वत: त्यांच्या भेटीला गेले. जाणता राजाचे उत्तम उदाहरण त्यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणात असल्याची भावना पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर-पुणे रोड येथील पक्ष कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदिप वर्पे, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, जि.प. सदस्या सौ.ढाकणे, निरीक्षक वर्षाताई शिवले, मा.आ. नरेंद्र घुले पाटील, प्रताप ढाकणे, मंजुषा गुंड, आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाला 21 वर्ष होत असताना सर्वसामान्यांसाठी प्रभावीपणे पक्ष कार्यरत आहे. जगभर कोरोनाचे संकट असताना राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वाने कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यास यश येत आहे.

राजकीय कार्यक्रम न घेता रक्तदान सारख्या सामाजिक उपक्रमाने पक्षाचा स्थापना दिन साजरा करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात जिल्ह्यासह महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवड भरुन काढण्यासाठी या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

कोरोनाची भिती बाजूला सारुन राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता सर्वसामान्यांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे. राष्ट्रवादीने सर्वसामान्य व्यती केंद्रबिंदू मानून समाजकारण केले. कोरोना महामारी व कोकण येथील वादळ अशा संकटकाळात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष वयाच्या 80 व्या वर्षी सर्वसामान्यांना आधार देत आहे.

जिल्ह्यात देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या संकटकाळात गरजूंना विविध प्रकारे मदत केली. लाखो नागरिकांपर्यंत मदत पोहचल्याने त्यांच्यामध्ये एक प्रकारची समाधानाची भावना निर्माण झाली व तो कुटुंब राष्ट्रवादीशी जोडला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.

तर कोरोना संकटकाळात जीवाची बाजी लावून कर्तव्य बजाविणार्‍या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक व पोलीसांचे त्यांनी विशेष आभार मानले. सकाळी 10 वाजता प्रारंभी पक्षाचा झेंडा फडकाविण्यात आला.

रक्तदान शिबीराचे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रारंभ करण्यात आले. या शिबीरास युवा कार्यकर्त्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. कोरोना संकटकाळात विशेष योगदान महिला डॉक्टर, परिचारिका, पोलीस, शासकीय अधिकारी यांना मर्दानी महाराष्ट्राची या सन्मानाने पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24