अहमदनगर :- फडणवीस सरकाराने मंजूर केलेल्या कामांना महाविकास आघाडीच्या सरकारने हजारो कोटींच्या कामांना स्थगिती देऊन दणका दिला आहे. त्यापाठोपाठ आता थेट नगर जिल्हा परिषदेतही त्याचे लोन पोहचले आहे.
विखे कुटुंबाच्या ताब्यात असणाऱ्या नगर जिल्हा परिषदेतीलही लाखो रूपयांच्या कामांना तत्काळ स्थगिती देण्याचे आदेश थेट मुंबई ग्रामविकास व नगरपंचायत राज तसेच बांधकाम विभागाने दिले आहेत.
आजपासून कार्यारंभ आदेश न झालेल्या कामांना स्थगिती देण्यात यावी असा स्पष्ट उल्लेख केल्याने सकाळपासून जिल्हा परिषद सदस्यांची कामासाठी चांगलीच धावाधाव झाली आहे. कामांना कार्यारंभ आदेश घेण्यासाठीही मोठी झुंबड उडाली आहे.
आदेशात म्हटले आहे की, लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे, कोकण पर्यटनविकासकार्यक्रम, यात्रास्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम, ग्रामिण भागातील तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता रू. २ कोटी ते रू. २५ कोटी पर्यंत अनुदान या योजनेंतर्गत मंजुर कामांपैकी ज्या कामांचे कार्यारंभ आदेश अद्याप देण्यात आलेले नाहीत.
अशा सर्व कामांचे कार्यारंभ आदेश देण्याची कार्यवाही पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात यावीत. ज्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत अशा कामांची यादी शासन निर्णय निहाय यादी कार्यारंभ आदेशसच्या प्रतिसह शासनाच्या ई – मेल वर आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाठविण्यात यावी.
आपल्याकडून ज्या कामांचे कार्यारंभ आदेशाच्या प्रती आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासनाकडे प्राप्त होणार नाहीत अशा कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला नाही असे समजण्यात येईल. तसेच नमूद कालावधीपर्यंत सादर केलेल्या कार्यारंभ आदेशाच्या प्रती व्यतिरिक्त इरत कार्यारंभ आदेश आढळल्यास संबंधितांना जबाबदार धरून, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
ज्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. त्यांची नोंद एलआरएस प्रणालीवर केली नसल्यास अशा कामांची नोंद आज गुरूवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एलआरएस प्रणालीवर करण्यात यावी, मुदतीत नोंद प्रणालीवर नोंद न घेतल्यास संबंधीतांना जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
उपरोक्त निदेशनाच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करून शासनाला माहिती पाठवावी अशा सुचना करण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीचा दणका राज्यात सर्वप्रथम नगर झेडपीलाच का? नगर जिल्हा परिषद ही सध्या विखे कुटुंबाच्या ताब्यात आले.
ज्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्षा ना. शालीनी विखे झाल्या होत्या. तेव्हा विखे कुटुंब काँग्रेस पक्षात होते. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत विखे कुटुंब भाजपात आले. आता तर राज्यात ही महाविकस आघाडीचे सरकार आहे. म्हणजे विखे विरोधातील सरकार राज्यात आल्याने नगरच्या जिल्हा परिषदेतील कामांना ब्रेक लागल्याचे कळते.
महाविकास आघाडीचा हा दणका ज्या ज्या ठिकाणी भाजपकडे जिल्हा परिषद आहे त्या ठिकाणीच कामांना स्थगिती मिळाली असल्याचे बोलले जाते. मग पहिला आदेश नगर जिल्हा परिषदेला काढला की काय अशीही चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे.