Panjabrao Dakh News : राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसा संदर्भात. पंजाब रावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचे सत्र सुरू होणार आहे.
खरंतर उद्यापासून दिवाळीच्या पर्वाला सुरूवात होणार आहे. दीपोत्सवाचा आनंददायी पर्व वसुबारस अर्थातच उद्यापासून सुरू होणार आहे. दरम्यान यंदाच्या दिवाळीत पंजाबरावांनी महाराष्ट्रात पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे. राज्यात दिवाळीमध्ये पाऊस पडणार आहे मात्र सर्व दूर राहणार नाही, भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे, मोठा पाऊस राहणार नाही परंतु रिमझिम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.
उद्यापासून म्हणजे 28 तारखेपासून पावसाचे सत्र सुरू होईल. 28 तारखेला विदर्भातील यवतमाळ तसेच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या भागापासून पावसाला सुरुवात होणार आहे. पुढे 29 तारखेला पावसाची व्याप्ती आणखी वाढेल आणि बीड, लातूर, धाराशिव पर्यंत पाऊस पोहोचेल. 30 तारखेला हा पाऊस अहिल्यानगर, सातारा, सांगली पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
30 तारखेला आणखी पावसाची व्याप्ती वाढेल आणि हा पाऊस उत्तर महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत तसेच कोकण आणि पुण्याकडे जाणार आहे. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात देखील पावसाने होण्याची शक्यता आहे. एक नोव्हेंबरला राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात चांगला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एकंदरीत यंदा संपूर्ण दीपोत्सव पावसातच साजरा करावा लागणार आहे. पावसाचे प्रमाण फारसे अधिक राहणार नाही मात्र रिमझिम का होईना पण पाऊस अवश्य पडणार आहे. खरं तर सध्या संपूर्ण देशभरात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामातील विविध पिकांच्या पेरणीच्या कामाला वेग आला आहे.
शेतकरी बांधव सध्या आपल्या सर्व परिवारासहित शेतशिवारात रब्बी हंगामातील पिकाच्या पेरणीसाठी मेहनत घेत आहेत. गहू, हरभरा सारख्या मुख्य पिकांची पेरणी सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी पूर्ण केली आहे तर काही शेतकरी बांधव अजूनही पेरणीची कामे करत आहेत.
दुसरीकडे खरिपातील काही पिके अंतिम अवस्थेत आहेत. तुर पिक सध्या फायनल स्टेज मध्ये असून या पावसाचा रब्बी हंगामातील पेरणीच्या कामांना आणि तूर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी दिवाळीच्या काळात पडणाऱ्या या पावसाचा अंदाज घेऊनच आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन आखावे असा सल्ला यावेळी जाणकारांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.