बीड, दि. १ मे : महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी श्री.मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करत कामगार चळवळीतील प्रत्येकाच्या योगदानाचेही यावेळी संस्मरण केले.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आजचा समारंभ अत्यंत साधेपणाने पार पडला. यावेळी ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांसह महत्त्वाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
बीड पोलीस दलात सतत १५ वर्षे गुणवत्तापूर्ण सेवा दिल्याबद्दल पोलीस हवालदार मोहन क्षीरसागर, पोलीस हवालदार गणेश दुधाळ आणि पोलीस नाईक नरेंद्र बांगर यांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री श्री.मुंडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभाग यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिव्यांग नागरिकांसाठी नोंदणीसाठी ऑनलाइन ॲपचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख मान्यवरांसह महसूल, जिल्हा परिषद, समाज कल्याण, सहकार, पोलिस आदी विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.