रायगड-अलिबाग मधील रितेश घासे, आशिष पडवळ, पंकज वावेकर, समाधान चंदू, आरती पाठक, धनंजय साक्रूडकर, केतन भगत, नवीन मोरे या आठ जणांचं संगीत वेडं तरुण मित्र मंडळ.
सतत काहीतरी नवीन करण्याची धडपड, उमेद, जिद्द. सर्वांनी मिळून “बास कर” नावाचे प्रॉडक्शन हाऊस 2017 या वर्षी सुरू केले. हळूहळू लोकांकडून त्यांच्या कामाची पावती मिळू लागली आणि “झी म्युझिक” सारख्या आघाडीच्या म्युझिक कंपनीबरोबरही त्यांची म्युझिक अल्बमची कामे सुरू झाली.
कोरोनामुळे सगळे जगच संकटात पडले होते, त्यात आपला महाराष्ट्रही सुटला नाही. या काळात काहीच काम नाही, आहे ती कामेही पॉज मोडमध्ये ठेवावी लागली. अशात लॉकडाऊन आणि या लॉकडाऊनच्या काळात लोकांची होणारी घालमेल पाहून या तरुणांच्या मनाचीही चलबिचल वाढली.
काहीतरी करायलाच पाहिजे, या विचारांनी रात्रंदिवस ही तरुण मंडळी तळमळत होती. शेवटी कोरोना संकट आणि त्यामुळे सुरू झालेले लॉकडाऊन या परिस्थितीत जनसामान्यांची मानसिक स्थिती थोड्या फार प्रमाणात बिघडत चालली होती.
नागरिकांच्या या बिघडलेल्या मानसिक स्थितीला उभारी देण्यासाठी मग या सर्वांनी मिळून स्वखर्चाने तयार केले अवघ्या साडेतीन मिनिटांचे एक व्हीडिओ साँग.. हमने मन मे ठानी है.. विश्वास न टूटने देंगे हम.. हम को डटकर रहना है.. देश हित मे लडना है.. क्योंकि करोना को हराना है..हराना है..! हे गाणं.
या गाण्याच्या माध्यमातून देशहितासाठी कोरोनाला सर्वांनी एकजुटीने हरवायचे आहे, हा आत्मविश्वास या गाण्यातून नागरिकांना देण्याचा प्रयत्न या तरुणांनी केला आहे.
सर्व शासकीय यंत्रणा नागरिकांसाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत मात्र नागरिकांनीही शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असा संदेश देण्यात आला आहे.
स्वतः रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी या तरुणांना प्रोत्साहन दिले असून या गाण्याच्या माध्यमातून रायगडकरांनाही धीर दिला आहे की, आपण कोरोनाला नक्कीच हरवणार.
या आठ जणांच्या टीमने प्रोत्साहनात्मक सुंदर असे हे गाणे तयार केले आहे. त्यांना जवळपास 70 स्थानिक कलाकारांनी आपापल्या घरात राहूनच हे गाणे पूर्ण करण्यासाठी हातभार लावला आहे.
“स्पेशल अँथम” या टॅगने यूट्यूब ला शोध घेतला असता हे गाणे तात्काळ सुरू होते. पाहता पाहता या गाण्याला नागरिकांमधून खूपच चांगल्या प्रतिक्रिया मिळू लागल्या आहेत आणि या कलाकार तरुणांनी ज्या हेतूने या गाण्याची निर्मिती केली आहे, नागरिकांच्या प्रतिक्रियांवरुन बऱ्याच अंशी त्यांचा हा हेतू साध्य झाल्याचे दिसून येत आहे.
– मनोज शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग