आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था होणार कामाच्या ठिकाणीच

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अलिबाग : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यात संपूर्ण लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊन काळात पनवेल व नवी मुंबई येथून मुंबईत अत्यावश्यक सेवा कर्तव्यावर असलेल्या आरोग्य विभागातील डॉक्टर्स, 

नर्सेस, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय करण्यात येणार आहे. राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी शासनाला याबाबत विनंती केली होती.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणूबाधित व्यक्तींची माहिती घेतली असता प्रामुख्याने त्यामध्ये मुंबईत अत्यावश्यक सेवेत असणारे व पनवेल परिसरातून रोज ये-जा करत असणारे अधिकारी व कर्मचारी असल्याने एकंदरीतच कोरोना विषाणूची बाधा त्यांना त्यांच्या अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी झाल्याचा निष्पन्न झाले.

या पार्श्वभूमीवर याविषयी तातडीने निर्णय घेण्याविषयीची विनंती पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई, आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई यांना लेखी पत्राद्वारे पनवेल व नवी मुंबई परिसरातील वाढता करोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहाता

या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने त्यांना अत्यावश्यक सेवेतून काही प्रमाणात वगळणे किंवा त्यांच्या मुंबईतील अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणीच राहण्याची व्यवस्था करण्याबाबत विनंती केली होती.

त्याअनुषंगाने मुंबई येथे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, अधिकारी व कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणीच नजीकच्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24