लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ३४१ गुन्हे दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मुंबई, दि. २ : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात ३४१ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.

टिकटॉक, फेसबूक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये  ज्या ३४१ गुन्ह्यांची  नोंद झाली आहे त्यापैकी १४ गुन्हे अदखलपात्र (N.C.) आहेत.

जिल्हानिहाय गुन्हे

त्यामध्ये बीड ३०, पुणे ग्रामीण २७, जळगाव २६, मुंबई २१, कोल्हापूर १६, सांगली १२, नाशिक ग्रामीण १२, बुलढाणा १२, नाशिक शहर ११, जालना ११, सातारा १०, लातूर १०, नांदेड ९, पालघर ९, ठाणे शहर ८, परभणी ८, नवी मुंबई ८, सिंधुदूर्ग ७, अमरावती ७, ठाणे ग्रामीण ७,

नागपूर शहर ७, हिंगोली ६, गोंदिया ५, सोलापूर ग्रामीण ५, पुणे शहर ४, रत्नागिरी ४ ,सोलापूर शहर ४, नागपूर ग्रामीण ४, भंडारा ४, चंद्रपूर ३, पिंपरी- चिंचवड ३, रायगड २, धुळे २, वाशिम २, औरंगाबाद १ (एन.सी), यवतमाळ १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हॉट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १४१ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १२९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,

tiktok व्हीडिओ शेअर प्रकरणी १२ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत.

तर अन्य सोशल मीडियाचा (व्हीडिओ क्लिप्स, you tube) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत १७७ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी ६० आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.

मुंबई जे.जे मार्ग

मुंबईतील जे.जे मार्ग पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ज्यामुळे मुंबईतील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या २१ झाली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींनी कोरोना महामारीच्या काळात लागू असणाऱ्या नियमांचे उल्लंघन करून, पोलीस दलाची प्रतिमा मालिन करणारा एक टिकटॉक विडिओ बनवून तो सोशल मीडियावर टाकला होता.

नवी मुंबई कामोठे

नवी मुंबईतील कामोठे पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ज्यामुळे नवी मुंबईमधील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ८ झाली आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपींनी कोरोना महामारीच्या काळात, सरकारने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीबद्दल चुकीची माहिती देणारे मेसेज व्हाट्सॲपवरून विविध ग्रुपवर पाठविले होते, त्यामुळे कोरोना महामारीच्या सरकारी उपाययोजनांबाबत स्थनिक लोकांमध्ये द्वेष पसरून, परिसरातील शांतता बिघडून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता.

अफवांवर विश्वास ठेवू नये

सध्या लॉकडाऊनच्या काळात कोणत्या भागात काय सुरु राहणार यावर बरेच मेसेज सोशल मीडियावर (व्हाट्सॲप, फेसबूक इत्यादी) फिरत आहेत तसेच कुठला जिल्हा कुठल्या झोन मध्ये येतो आहे.

ते दर्शविणारे आलेख व चार्टस पण त्या मेसेजेसद्वारे पाठविले जात आहेत. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, तुम्हाला असे काही मेसेजेस किंवा फोटोज किंवा पोस्ट कोणी पाठविल्या तर कृपया त्या लगेच फॉरवर्ड करू नयेत.

आधी सदर मेसेजेसची सत्यता पडताळून बघा, मगच फॉरवर्ड करा. या कोरोना महामारीच्या काळात चुकीची माहिती व अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे असे मेसेज कोणाला पाठवू नये.

सर्व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका.

अहमदनगर लाईव्ह 24