नाशिक दि. 2 मे (जिमाका) : परप्रांतीय मजुरांची नाशिकच्या प्रशासनाने कुटूंबाप्रमाणे काळजी घेतली. गेला दीड महिना सर्व यंत्रणा या मजुरांसाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी झटत होती.
त्यामुळेच तर आज रेल्वे सुटतांना त्यांच्या डोळ्यात पाणी होते. गाडी सुटतांना या प्रवाशांनी महाराष्ट्र सरकार की जय, जय महाराष्ट्र, अशा घोषणा देवून एकप्रकारे नाशिकच्या प्रशासनालाच धन्यवाद दिले, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. या प्रवाशांना निरोप देताना पालकमंत्री देखील भावूक झाले होते.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबई आणि उपनगरांतून पायी उत्तर प्रदेशकडे निघालेल्या या मजुरांना इगतपुरी, नाशिक येथे थांबवून निवारागृहात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
या सर्व मजुरांना आज विशेष रेल्वेने उत्तर प्रदेशला रवाना करण्यात आले. या गाडीला निरोप देण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार परमेश्वर कासुळे उपस्थित होते.
नाशिक शहरातील विविध निवारागृहात गेल्या दीड महिन्यापासून थांबून असलेल्या उत्तर प्रदेश येथील ८४७ कामगार, मजूरांना शनिवारी सकाळी नाशिक येथून विशेष रेल्वेने उत्तर प्रदेश लखनऊला रवाना करण्यात आले. यामध्ये मुंबई, नालासोपारा, कल्याण, नेरूळ येथील मजूर होते.
श्री.भुजबळ म्हणाले, मुंबई येथून पायी चालत आलेल्या या परप्रांतीय मजुरांमध्ये लिंबू पाण्याचा व्यवसाय करणारे, दूध विक्रेते, वडापावचे व्यावसायिक होते. लॉकडाऊन जाहीर होताच हे सगळे पायीच गावाकडे निघाले होते.
मात्र त्यांना नाशिक आणि इगतपुरी येथील निवारागृहात थांबवून तेथे त्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती. गेल्या दीड महिन्यात त्यांना दोन वेळेचे जेवण, चहा, नाश्ता अस सगळे पुरविले जात होते.
या सर्वांची वेळोवळी आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. त्यांच्या मुलांना लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये जे अजूनही कोरोना संशयित वाटत होते, त्यांना नाशिक येथेच थांबविण्यात असून त्यांच्या आरोग्याची काळजी आपण घेत आहोत.
उर्वरितांना आज या विशेष रेल्वेने सोडण्यात येत आहे. गाडीतही त्यांना सुरक्षित वावर ठेवत बसविण्यात आले आहे. सोबत दोन वेळेचे जेवण, पिण्याचे पुरेसे पाणी देण्यात आले आहे.
गेला दीड महिना जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, आरोग्य यंत्रणा यांनी या परप्रांतीय मजूरांची खूप काळजी घेतली, अशा शब्दात पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेच्या कामाचे कौतुक केले.
या सर्व परप्रांतियांच्या चेहऱ्यावर आज घरी जाण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. गौरवाची आणि अभिमानाची बाब म्हणजे रेल्वे सुटली तेव्हा त्यांनी मोठमोठ्याने महाराष्ट्र सरकार की जय, जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या. आपण अपेक्षा करू हा कोरोना लवकरच महाराष्ट्रातून, भारतातून आणि संपूर्ण जगातून नाहीसा होईल, असा आशावादही पालकमंत्री भुजबळ यांनी व्यक्त केला.
नाशिक मधून आज उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे जाण्यासाठी दुसरी रेल्वे गाडी रवाना करण्यात आली. ८४७ नागरिकांना घेऊन जाणाऱ्या गाडीत पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, जेवण, बिस्किटे सर्व काही देऊन ही गाडी निघाली आहे.
रेल्वे सुटल्यावर या उत्तर प्रदेशातील मंडळींनी जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकार जिंदाबाद असा जयघोष केला. म्हणून आपण या संकटाचा मुकाबला करू शकू याबद्दलचा आत्मविश्वास आज दुणावला असल्याचे मत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी व्यक्त केले.