शेवगाव -: आमच्या काळात मंजूर असलेल्या पाणी योजना अद्याप बंद का आहेत? केंद्र व राज्यात सत्ताधारी असताना येथील पाण्याकरिता लोकप्रतिनिधींनी काय दिवे लावले? असा सवाल करत ११०० कोटींची विकासकामे केल्याचा आव आणत जनतेला मोठी स्वप्ने दाखवून निव्वळ भुलवण्याचा एककलमी कार्यक्रम आमदारांमार्फत सुरू असल्याचा आरोप माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केला.
बाजार समितीचे संचालक प्रल्हाद शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गणेश मंगल कार्यालयात राष्ट्रवादीच्या बोधेगाव परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळावा मंगळवारी झाला. यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले, केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे, उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, मोहन देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाणे, सुरेश दुसुंगे, पं. स. उपसभापती शिवाजी नेमाणे, भाऊराव भोंगळे, राम अंधारे, भाऊसाहेब निर्मळ, नाना मडके, आयुब शेख, राजेंद्र ढमढेरे, राम घोरतळे आदी उपस्थित होते.
चंद्रशेखर घुले म्हणाले, आमच्या काळात गाव तेथे छावण्या सुरू केल्या होत्या. या सरकारने मात्र छावण्यांकरिता आमदारांचे पत्र बंधनकारक करत चाऱ्यापेक्षा ऑनलाइन कामे आणि शेणाच्या हिशेबात जास्त लक्ष दिले. शेवगावात पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी मोर्चे करावे लागले हे दुर्दैव आहे. निर्णय बदलून उभ्या केलेल्या बोधेगाव ग्रामीण रुग्णालयाला आमदार साधे डॉक्टर देऊ शकले नाहीत, असा आरोप करत बोधेगाव व परिसरातील ३५ गावांचा विकास करायचा असेल, तर राष्ट्रवादीला पर्याय नसल्याचे घुले यांनी सांगितले.
बोधेगाव परिसरातील मंजूर पाणी योजना बंद असताना पैठणवरुन बोधेगावमार्गे शेजारील गेवराई तालुक्याला पाणी जात आहे. या पाणी योजनेच्या पाइपलाइनला गावोगावी छिद्र पाडून त्यातून पाणी घेऊन ग्रामस्थांची तहान भागवू, तसेच परिसराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वस्व पणाला लावू, अशी ग्वाही त्यांनी दिली. कांद्याला चांगला भाव मिळत असतानाच या सरकारने निर्यातबंदी लागू करत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याची टीका ढाकणे यांनी केली. खोटे बोलून आभासी चित्र निर्माण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. खोटे आश्वासन देणाऱ्यांना जनता ओळखतेे. प्रास्ताविक संजय कोळगे यांनी केले. सूत्रसंचालन कैलास नेमाणे यांनी केले.