श्रीगोंदे :- या निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमुक्त करून राष्ट्रवादीची टिक टिक बंद करण्यात येईल, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी गुरुवारी श्रीगोंदे येथील जाहीर सभेत सांगितले. भाजपचे उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संत शेख महंमद महाराज पटांगणात आयोजित विजयी संकल्प मेळाव्यात विखे बोलत होते.
पालकमंत्री राम शिंदे, पक्षनिरीक्षक विठ्ठल चाटे, भगवानराव पाचपुते, दादासाहेब जगताप, सदाशिव पाचपुते, दत्तात्रय पानसरे, संतोष लगड, बाळासाहेब महाडिक, भाऊसाहेब गोरे, सुभाष डांगे, संतोष खेतमाळीस, छाया गोरे, सुनीता शिंदे यावेळी उपस्थित होते.
खासदार विखे म्हणाले, पवारांनी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला व आमच्या कुटुंबाला त्रास दिला आहे. कुकडीच्या व घोडच्या पाण्याबाबत घोर निराशा केली आहे. त्यामुळे आमचा संघर्ष फक्त पवार शक्तीच्या विरोधात आहे.
विरोधकांना ईडीची भीती दाखवली जाते असा आरोप भाजप सरकारवर केला जातो. पवारांकडे ७ खासगी साखर कारखाने आहेत. त्यासाठी पैसा कुठून आला? राज्यात त्यांच्या मोठमोठ्या मालमत्ता कोठून आल्या याचा शोध घेतला जाणार आहे.
लवकरच या सगळ्यांची चौकशी करून त्यांना आम्ही बेड्या ठोकणार आहोत. पालकमंत्री राम शिंदे म्हणाले, राज्यातील आणि श्रीगोंद्यातील निकाल सांगण्यासाठी ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही. फक्त मताधिक्य मोजायचे आहे.
श्रीगोंदे मतदारसंघात युतीच्या विरोधातील उमेदवार फुसका निघाला आहे. आजपर्यंत श्रीगोंदे मतदारसंघात असं कधी झाले नाही. आजपर्यंत नागवडे अणि पाचपुते यांच्यात लढत ठरलेल्या होत्या. आता मात्र तशी लढत राहिली नाही.
तालुक्यात वारं कसं वाहतं आहे हे सर्वांना माहीत अाहे. हवा जोरात वाहत आहे, हवेच्या दिशेने नीट उफणा नाही, तर बनग्या त्रास देतील, असे त्यांनी सांगितले. कुकडी प्रकल्प सिंचन क्षेत्रानुसार असलेले पाणी आजपर्यंत आपल्याला मिळाले नाही.
मी आणि पाचपुते दोघे मिळून कुकडीच्या प्रकल्प अहवालात असलेले पाणी खाली आणणार. कायद्यानुसार पाणी मिळाले नाही, तर पुणेकरांना बेड्या ठोकून पाणी आणू, असे शिंदे म्हणाले. पाण्यापासून वंचित ठेवण्याचा डाव काँग्रेस, राष्ट्रवादीचा होता. साकळाईच्या सर्व्हेचे आदेश दिले आहेत, असे शिंदे म्हणाले.