नाशिक दि. 4 मे 2020 (जिमाका): सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये मद्य विक्रीस शासनाने परिपत्रकाद्वारे 3 मे 2020 रोजी परवानगी दिली.
नाशिक शहर रेड झोनमध्ये असूनही मद्यविक्री दुकाने सुरू करण्यात आली. परंतु बऱ्याच मद्य विक्री दुकानांवर सुरक्षित वावराच्या नियमांना पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.
यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन पोलिसांना मनुष्यबळाचा वापर करावा लागला. म्हणून पुढील आदेशापर्यंत नाशिक शहरातील मद्य विक्री दुकाने बंद राहतील.
तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित दुकानांचे परवाना रद्द करण्यात येईल, तसेच सवलतींचा अतिवापर झाल्यास त्या बंद करणे क्रमप्राप्त ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे..
याबाबत आज जारी करण्यात आलेल्या आदेशात श्री. मांढरे म्हणतात, शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेत सोमवारी नाशिक शहरातील सर्व मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली.
मात्र बहुतांशी दुकानांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन हाणामारीदेखील झाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिस विभागाला मनुष्यबळाचा वापर करावा लागला.
तसेच सदर दुकानांवर कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर, चेहऱ्यावर मास्क घातले जात नसल्याची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे.
ही दुकाने सुरू ठेवल्यास मोठ्या प्रमाणावर विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नाशिक शहर विभागातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद राहणार असल्याचे श्री. मांढरे यांनी कळविले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईस पात्र असतील.
तसेच आदेशाचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास परवाना तात्काळ रद्द करण्यात येणार असल्याचेही श्री. मांढरे यांनी कळविले आहे.