कर्जत-जामखेड मतदारसंघातून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. जलसंपदामंत्री गिरिश महाजन, आ. मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी रॅली काढून मोठे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली.
विखे, शिंदेंना मंत्रिपदे – कर्डिले
भाजपचे आमदार कर्डिले यांनी मंत्री पदाचा मुद्दा उपस्थित करताच एकच हशा पिकला. ते म्हणाले, मुख्यमंत्री कर्जतमध्ये आले असता राम शिंदे यांना निवडून द्या त्यांना पुन्हा मंत्री करतो, असे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर ते राहुरीतही आले. पण तिथे ते तसे काही बोलले नाही.
असे कर्डिले म्हणताच व्यासपीठावर उपस्थित असलेले सुजय विखे म्हणाले की, आमच्याकडे तर मुख्यमंत्री आलेच नाही. त्यावर कर्डिले म्हणाले, तुमच्याकडे आले नसले तरी तुम्हाला मंत्री पद मिळेल. मला मंत्री पद देऊ नका, पण राम शिंदे यांना मंत्री पद द्या, असे आपण मुख्यमंत्र्यांना सांगणार असल्याचे कर्डिले यांनी यावेळी सांगितले.
पवारांना आमच्या एवढे कोणी ओळखत नाही – खा. विखे
मी जेवढे ओळखतो तेवढे पवारांना राज्यात कोणी ओळखत नाही. त्यांच्या विरोधात आम्ही कायम संघर्ष केला. कुणाला घाबरलो नाही. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला, ते जेलमध्ये जाणारच आहेत.
माझे लाड पुरवायला कर्जत-जामखेडची जनता खंबीर आहे. सरकार आपले येणार आहे, मग पालकमंत्रीही आपलाच पाहिजे, असे आवाहन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
जनतेसाठी दहा वर्षे साल घातले – राम शिंदे
माझे आई-वडील अशिक्षित असल्याने ते कार्यक्रमाला येत नाहीत. पण आज ते मला आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. कर्जत जामखेडच्या जनतेने सालकऱ्याच्या मुलाला आमदार गेले. दहा वर्षे श्रद्धा व निष्ठा ठेवून काम केले.
शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी मिळवून दिले. हक्काचे पाणी मिळवण्यासाठी पुढे कायदा करू. जे खाते मिळाले, त्यातून मतदारसंघातील जनतेला लाभ दिला. त्यामुळे तुम्ही मला आशीर्वाद द्याल, असे ना. शिंदे यावेळी म्हणाले.