श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे यांनी शनिवारी आयोजित केलेल्या समर्थकांच्या मेळाव्यात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी अचानक हजेरी लावली. यावरून नागवडे कुटुंब लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर ढोकराई फाटा येथे प्रगती कार्यालयात नागवडे समर्थकांचा मेळावा झाला. नागवडे निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मेळाव्यास अनुराधा नागवडे, दीपक नागवडे, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, सुनील भोस, सुभाष शिंदे, विश्वनाथ गिरमकर, योगेश भोईटे, संजय महाडुळे आदी उपस्थित होते.
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीकडे विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली होती. माजीमंत्री हर्षवर्धन पाटील आणि खासदार विखे यांच्या मदतीने भाजपकडे देखील उमेदवारीसाठी प्रयत्न केले.
मात्र, आजही विखे कुटुंबाने साथ दिल्यास १५ दिवसांत नागवडे कार्यकर्त्यांच्या बळावर आमदार होतील. इथून पुढच्या काळात आमच्याबरोबर जे येतील त्यांना सर्वोतोपरी ताकद देण्याचे काम करू. माजीमंत्री पाचपुतेंशी आमचे कधीच जमले नाही.
भविष्यात देखील कधीच जमणार नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुजय विखे यांनी नगरपालिकेसाठी निधी, घोड, कुकडीसह साकळाईचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करण्याचा शब्द द्यावा.
त्याचबरोबर उद्याच्या काळात नागवडे कुटुंबातील व्यक्तीला आमदारकी मिळवून देण्याची जबाबदारी विखे यांनी घेतली तर आपण उमेदवारी अर्ज मागे घेऊ अन्यथा पूर्ण ताकदीनिशी विधानसभा निवडणूक करू,’ असे प्रतिपादन नागवडे यांनी केले.
खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, श्रीगोंद्याचे राजकारण चढउताराचे आहे. काही जण सकाळी एकीकडे व दुपारी दुसरीकडे असतात. त्यांना थांबवायचे आहे.
खासदार होण्यात नागवडे कुटुंबाचे सहकार्य आहे. यापूर्वी नागवडे चुकीच्या गाडीत बसल्याने त्यांचे नुकसान झाले. मी सगळीकडे हात ठेवून काम करणारा आहे. विधानसभेसाठी नागवडे यांचा अर्ज राहिला तरी मला पक्षाचाच उमेदवार निवडून आणावा लागेल.
भाजपमध्ये माझे कुणी ऐकत नाही. तेथे रचनात्मक काम आहे. सत्तेविरोधात संघर्ष करून काय मिळणार? निवडून येण्यासाठी येथे सहकार्य लागणारच. विखेंच्या शब्दावर विश्वास ठेवून निर्णय घ्या.