बाळासाहेब थोरांतापेक्षा विरोधी उमेदवार चौपट श्रीमंत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर :- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यापेक्षा महायुतीचे साहेबराव नवले यांची मालमत्ता चौपट आहे. थोरात कुटुंबीयांची एकत्रित मालमत्ता १२ कोटी असून नवले कुटुंबीयांची मालमत्ता ४४ कोटी ६३ लाखांच्या घरात आहे.

आमदार थोरात यांच्याविरोधात दहा जण निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र, त्यांची लढत शिवसेनेचे साहेबराव नवले यांच्याशी आहे . हे दोन्ही उमेदवार आर्थिकदृष्ट्या तगडे आहेत. थोरात यांच्या कुटंबात त्यांच्यासह पत्नी कांचन, मुले डॉ. जयश्री आणि राजवर्धन यांचा समावेश आहे.

त्यांचा व्यवसाय शेती आणि समाजसेवेशी निगडित असून उत्पन्नाचा स्त्रोत शेती आणि विधानसभा सदस्याचे मिळणारे मानधन आहे. पत्नी कांचन यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत शेती व विविध ठिकाणच्या जागेतून येणारे भाडे आहे.

या कुटुंबाची एकत्रित जंगम मालमत्ता १ कोटी ९९ लाख, तर ९ कोटी ८५ लाखाची स्थावर मालमत्ता आहे. थोरात परिवारातील कोणाकडेही वाहन नाही. कुटुंबाकडे एकूण ४८ लाखांचे सोने व जडजवाहीर आहे. संगमनेर, जोर्वे, जाखुरी, समनापूर आदी ठिकाणी शेती व बिनशेती जमीन आहे.

मुंबईतील वरळी येथे सागर हाऊसिंग सोसायटीमध्ये थोरात व जयश्री थोरात यांची संयुक्त मालकीची सदनिका आहे. नवले यांच्या कुटुंबांत त्यांच्यासह पत्नी मीरा आणि अविभाज्य कुटुंबातील एक व्यक्ती अशा तिघांचा समावेश आहे.

नवले दांम्पत्याचा उत्पन्नाचा स्त्रोत शेती आणि खते, आैषधे, बियाणे, सिमेंट आणि शेतीपयोगी साहित्य खरेदी-विक्री असा आहे. एकत्रित जंगम मालमत्ता १२ काेटींच्या आसपास आहे. तिघांची एकत्रित स्थावर मालमत्ता ३२ कोटी ६५ लाख आहे.

कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावावर विविध ठिकाणी जमिनी आहेत. त्यांचे स्वतःचे मालदाड गाव, गुंजाळवाडी, कासारा दुमाला, पिंपळे, सोनोशी, धांदरफळ बुद्रूक, संगमनेर येथील जागा, जमिनींचा समावेश आहे. नाशिक, गुंजाळवाडी, संगमनेर, श्रीरामपूर, साकुरी, पुणे आदी ठिकाणी त्यांच्या व्यावसायिक इमारती आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24