चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रावर गर्दी होऊ नये तसेच शेतकऱ्यांना एकत्रितरित्या खरीप हंगामासाठी लागणारी बियाणे खते यांचा त्यांचे बांधावर पुरवठा करण्याच्या
उद्देशाने निविष्ठा पुरवठा करणाऱ्या वाहनास पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे हिरवी झेंडी दाखवून बियाणे खते व किटकनाशके पुरवठा मोहिमेस प्रारंभ केला.
थेट बांधावर बियाणे, खत पुरवठा करण्याच्या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले.
याअंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील चोरगाव येथील महात्मा फुले शेतकरी बचत गटातील ३५ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटप्रमुख तथा शेतकरी मित्र पांडूरंगजी कोकोडे
यांनी २८० किलो बियाणे आणि रासायनिक खताच्या ३०८ पिशव्या खरेदी करिता लागणारी रक्कम २ लाख ३१ हजार गटातील सर्व शेतकऱ्यांकडून गोळा करून व्यंकटेश कृषी सेवा केंद्रातून एकत्रित खरेदी केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील,
कृषी उपसंचालक तथा उप विभागीय कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप वाहणे उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील आत्मा नोंदणीकृत ३ हजार २०० गटांनी आपल्या गटातील तसेच इच्छुक असलेल्या गटाबाहेरील शेतकऱ्यांनी एकत्रितरित्या बियाणे आणि खते यासाठी लागणारी रक्कम त्यांच्या गटाचे गट प्रमुखाकडे गोळा करून
त्यांचे मार्फत कृषी सेवा केंद्र किंवा थेट कंपनी यांचेकडून खरेदी करण्याची कार्यवाही करावी. जेणेकरून कृषी सेवा केंद्रावर गर्दी होणार नाही.
याकरिता गटाची बियाणे आणि खते खरेदीची एकत्रित मागणी तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत संबधित कृषी सेवा केंद्र किंवा थेट कंपनीकडे नोंदविण्याची कार्यवाही करावी असे आवाहन कृषी विभागाअंतर्गत करण्यात येत आहे.